Chinchwad News : खुनाच्या प्रयत्नाचा गुन्ह्यातील आरोपी पोलीस चौकीतून पळाला

एमपीसी न्यूज – खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी पोलीस चौकीतून पोलिसांची नजर चुकवून पळाला. ही घटना बुधवारी (दि. 8) दुपारी पावणे पाच वाजता वाल्हेकरवाडी पोलीस चौकीत घडली.

राजकुमार रोहित गुप्ता (वय 34, रा. संभाजीनगर, आकुर्डी. मूळ रा. बिहार) असे पोलीस चौकीतून पळालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास मडके यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजकुमार याच्यावर एप्रिल 2021 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यात त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने 10 डिसेंबर पर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राजकुमार याला पिंपरी पोलीस ठाण्यातील लॉकअप मध्ये ठेवण्यात आले होते. बुधवारी (दि. 8) त्याला पिंपरी लॉकअप मधून चौकशीसाठी वाल्हेकरवाडी पोलीस चौकीत आणण्यात आले होते.

दरम्यान, पोलीस चौकीत राजकुमारने जीव गुदमरल्याचा आणि उलटी आल्याचा बहाणा केला आणि चौकीच्या बाहेर आला. त्याने पोलिसांची नजर चुकवून त्याच्या हातातील बेडी काढून ती चौकीतल्या बाकावर ठेवली आणि पळून गेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

असे आहे राजकुमार याचे खुनी हल्ला प्रकरण

10 एप्रिल 2021 रोजी दळवीनगर, चिंचवड येथे पेट्रोल चोरी करताना हटकल्याच्या कारणावरून दोन गटात भांडण झाले. त्यात दोन्ही गटांनी एकमेकांवर खुनी हल्ले केले. पहिल्या गुन्ह्यात राजकुमार रोहित गुप्ता (वय 34) याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विष्णू शिगवण, लहू भिसे, प्रशांत कोकरे आणि एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. दळवीनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

10 एप्रिल रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास आरोपी हे फिर्यादी राजकुमार गुप्ता याच्या गाडीतील पेट्रोल चोरी करीत होते. याबाबत फिर्यादी गुप्ता याने आरोपींना हटकले त्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करत पाहून घेण्याची धमकी दिली. या घटनेचा राग मनात धरून आरोपींनी राजकुमारच्या घरात घुसून कोयता व लोखंडी रॉडने राजकुमार आणि त्याचा मेहूणा यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.

याच्या परस्पर विरोधात एका अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली. त्यानुसार राजकुमार गुप्ता, चंदनप्रसाद गुप्ता (वय 33, दोघेही रा. दळवीनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 10 एप्रिल रोजी सकाळी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांचे मित्र विष्णू शिगवण, लहू भिसे यांच्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.