Sangamner News : उद्योजकांनी जेआरडी टाटा यांच्याप्रमाणे समाजसेवाभाव जपावा : बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेतर्फे उद्योग पुरस्कारांचे वितरण

एमपीसीन्यूज : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योग निर्मिती करणाऱ्या ग्रामीण आणि शहरी भागातील युवा उद्योजकांना भारतरत्न जे आर डी टाटा यांच्या नावाचा पुरस्कार पुण्यातील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद करीत असून हा स्तुत्य उपक्रम आहे. उद्योजकांनी भारतरत्न जे आर डी टाटा यांच्याप्रमाणे समाजसेवाभाव जपला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर येथील मालपाणी सभागृहात उद्योजक गिरीश मालपाणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या उद्योग पुरस्कार प्रदान सोहळ्यात मंत्री थोरात बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेर नगराध्यक्षा दुर्गा तांबे, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे अध्यक्ष सुदाम भोरे, उद्योजक रंगनाथ गोडगे उपस्थित होते.

मंत्री थोरात पुढे म्हणाले, पुरस्कार देणे आणि घेणे आजकाल फॅशन झाली आहे. यावर आधिक न बोललेले बरे !. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद गुणवत्ता पाहून योग्य उद्योजकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत आहे. नम्रतेचे दुसरे नाव म्हणजे भारतरत्न जे आर डी टाटा आहेत.

गणेशपूजन करून उद्योग पुरस्कार प्रदान सोहळ्याची सुरुवात झाली. कवी प्रशांत केंजळे, कवी राजेंद्र वाघ, कवी राजेंद्र उगले यांनी स्वागतगीत सादर केले. बाजीराव सातपुते यांनी जेआरडी टाटा यांचा समग्र इतिहास कथन केला.

डॉ. सुधीर तांबे म्हणाले, ‘अनेक उद्योग विकसित झाले तर बेरोजगारी कमी होईल.यासाठी आजच्या तरुणांनी उद्योगक्षेत्राकडे वळले पाहिजे. याचे फलित म्हणून भारत महासत्ता बनेल !.’

उद्योजक गिरीश मालपाणी म्हणाले, ‘कोणताही उद्योग कष्टानेच मोठा होत असतो. यासाठी जिद्द, चिकाटी, ध्येयवाद हे गुण उद्योजक म्हणून अंगिकारले पाहिजेत. भारतरत्न जे आर डी टाटा यांचे दातृत्व देशासाठी अभिमानास्पद आहे’.

सुदाम भोरे म्हणाले, ‘भारतरत्न जेआरडी टाटा यांचा आदर्श उद्योजकांनी घेतला पाहिजे. आपण समाजाचे देणं लागतो याची जाणीव ठेवून सातत्यपूर्ण काम केले पाहिजे. ग्रामीण भागातील किसानपुत्र संघर्ष करून उद्योजक म्हणून पुढे येत आहेत त्यांना स्फूर्ती मिळावी यासाठी परिषद गेल्या अठरा वर्षांपासून नवउद्योजकांना भारतरत्न जे आर डी टाटा यांच्या नावाचा पुरस्कार देत आहे.

पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कारप्राप्त उद्योजकांना छोटे, छोटे प्रश्न विचारून बोलते केले.

आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन इटकर यांना उद्योगमित्र पुरस्कार, नांदेडचे मारोतराव कवळे गुरुजी यांना उद्योगरत्न पुरस्कार, चैतन्य मिल्क फार्म देवळाली प्रवराचे संस्थापक,अध्यक्ष गणेश भांड यांना उद्योगविभूषण पुरस्कार, सुप्रिया पॉलिगर्स संगमनेर संचालक नानासाहेब वर्पे यांना उद्योगभूषण पुरस्कार, चिंचोली गुरव, संगमनेरचे सतीश आभाळे यांना कृषिपुरक उद्योग पुरस्कार, डायनोमर्क कंट्रोल्स भोसरी पुणे येथील अक्षरा राऊत यांना उद्योगसखी पुरस्कार, डायनोमर्क कंट्रोल्स भोसरी पुणे येथील मॅनजर हेमंत नेमाडे यांना उद्योगसारथी पुरस्कार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे,सूर्यकांत मुळे, अरुण गराडे, सुनील उकिरडे, बाजीराव सातपुते ,राजेंद्र वाघ, सुरेश कंक यांनी संयोजनासाठी परिश्रम घेतले.

सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले. आभार अरुण इंगळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.