Loksabha election : महाविकास आघाडीतील सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल

मोदींचा पराभव करायला तयार रहा : शरद पवार यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने शेतकरी, महिला, रोजगार याबाबत दिलेली आश्वासने आणि वस्तुस्थिती यात प्रचंड फरक आहे. पेट्रोलचा भाव 2015 साली 71 रुपये प्रतिलिटर होता पण आज पेट्रोलचा भावात कडाडून वाढ होऊन प्रतिलिटर 106 रुपये झाला आहे. तसेच, 410 रुपयांचा  सिलेंडर  आज 1160 रुपये झाला आहे. नरेंद्र मोदींनी भारतातील तरुणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे वचन दिले होते मात्र गेल्या दहा वर्षांत नोकऱ्या देण्याऐवजी  कमी झाल्या आहेत म्हणून येत्या निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजपचा दारूण मतांनी पराभव करा अशी टीका शरद पवार यांनी आज (दि.18) रोजी पुणे येथे केली.

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पुणे, शिरूर आणि बारामती या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ बोलताना शरद पवार पुढे म्हणाले,पंतप्रधान मोदींवर टीका केली म्हणून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि बंगालचे तीन मंत्री तुरुंगात गेले असून या देशातील लोकशाही उद्ध्वस्त होत आहे. सत्तेचा उन्माद काय असतो हे मोदींनी दाखवले आहे.या लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव (Loksabha election)  करण्यासाठी तयार रहा,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

 

पुण्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे व शिरूरचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांनी आज (दि.18) रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. या सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीतर्फे जाहीर सभा झाली त्यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपप्रणित सरकारवर जोरात हल्ला चढवला. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, डॉ. विश्वजित कदम, शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यावेळी उपस्थित होते.

 

Loksabha election : काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने मला अमेठीमधून निवडणूक लढवण्यास सांगितले तर मी लढेन – राहुल गांधी

आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाची असल्याचे मोदी सगळीकडे सांगतात परंतू डॉ. मनमोहनसिंग यांनीच आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया घातला होता. नरेंद्र मोदींच्या निर्णयाने आपल्या देशाची अर्थव्यवस्था कोसळली  आहे.  खतापासून ते पेट्रोलपंपापर्यंत सगळीकडे मोदींचा फोटो लावला जातो. आमदार पळाले असले तरी मतदार त्यांच्या जागी आहेत आणि या देशातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल,असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

 

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, पुण्यातल्या तिन्ही उमेदवारांकडे अख्या देशाचे लक्ष लागले आहे. इंडिया आघाडीचे सर्व  उमेदवार प्रचंड मतांनी (Loksabha election) विजयी झाले पाहिजे आणि येत्या विधानसभा निवडणुकीत  मुख्यमंत्रीही महाविकास आघाडीचा झाला पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.