Sangavi News : राज्याच्या सूक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाच्या संचालकपदी नियुक्तीचे आमिष दाखवून डॉक्टरची 1 कोटी 6 लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्याच्या सूक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाच्या संचालकपदी नियुक्तीचे आमिष दाखवून डॉक्टरची तब्बल 1 कोटी 6 लाखाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंत्रालयाच्या कक्ष अधिका-यासह तीन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 सप्टेंबर 2020 ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीत हा प्रकार घडला.

याप्रकरणी डॉ. आदित्य दगडू पतकराव (वय 36, रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) यांनी शुक्रवारी (दि.26) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मंत्रालय कक्ष अधिकारी राजाराम शिर्के, विकास शिंदे (रा. पनवेल, नवी मुंबई), श्रेया चौहान (रा. विक्रोळी, मुंबई) आणि अजित दुबे (रा. नवी मुंबई) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी फिर्यादी डॉक्टर यांना महाराष्ट्र राज्याच्या सूक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाच्या संचालकपदी नियुक्तीचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून तब्बल 1 कोटी 6 लाख रूपये घेतले, आणि भारत सरकारच्या मुद्रा चुकीच्या आणि बनावट पद्धतीने वापरून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली असे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.