Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख 17 – प्रेमवेडी स्मिता पाटील

एमपीसी न्यूज : सावळा पण आकर्षक रंग, बोलका चेहरा, तितकेच बोलके आणि काळजाचा ठाव घेणारे डोळे, अभिनयाची अफाट जाण, उपजत गुणवत्ता असे एकाहून एक वरदान (Shapit Gandharva) तिला परमेश्वराने बहाल केले होते; पण त्याचसोबत दिला होता एक शाप. म्हणूनच वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षीच ती खूप मोठे यश, नावलौकिक मिळवून देवाघरी निघून गेली.

‘स्मिता गिरीधर पाटील’ म्हणजेच तमाम मराठी रसिकांची लाडकी ‘स्मिता पाटील’ ही एक अद्भूत रसायनच होती जणू! 17 ऑक्टोबर 1955 साली तिचा जन्म एका तालेवार कुटुंबात झाला. तिचे वडील गिरीधर पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातले मोठे आणि आदरणीय नाव होते, तर तिची आई विद्या पाटील ही एक गृहिणी होती. तिचे बालपण अतिशय लाडाकोडात गेले. तिच्या वडिलांचे मूळ गाव खानदेशातील शिरपूर हे होते. मात्र, राजकारणातल्या सक्रीयतेमुळे ते पुण्यात वास्तव्यास होते.

स्मिताने पुण्यातील प्रसिद्ध भावे मुलींची प्रशाला (रेणुका मेमोरियल स्कूल) येथून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. तर, पुढील शिक्षण मुंबई विद्यापीठातून साहित्य (Shapit Gandharva) विषयात पदवी मिळवून पूर्ण केले. तिला शाळेत असल्यापासूनच अभिनयाची आवड होती. शाळेच्या अनेक सांस्कृतिक उपक्रमांत आणि नाटकांत ती उत्स्फूर्तपणे सहभागी होत असे. याच आवडीपायी ती खूपदा पुण्याच्या राष्ट्रीय फिल्म इन्स्टिट्यूटच्या आवारात जात असे. बऱ्याच जणांचा त्यामुळेच गैरसमज झाला, की ती एफ.टी.आयची विद्यार्थिनी आहे. पण, तिने कुठेही अभिनयाचे अधिकृत प्रशिक्षण घेतले नव्हते.

ती 14 वर्षांची असताना म्हणजेच 1969 साली तिच्या वडिलांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने तिचे कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले आणि इथून पुढे तिच्या कर्तृत्वाला खऱ्या अर्थाने चार चांद लागायला सुरुवात झाली. 1974-75 साली तिला मराठी दूरदर्शनवर (आताची सह्याद्री वाहिनी) वृत्तनिवेदिका म्हणून प्रथम संधी मिळाली. याच वेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तळवलकर आणि भक्ती बर्वे-इनामदारही तिच्यासोबत आपले नशीब आजमावत होत्या. (काय विलक्षण योग आहे हा पहा! या तिघीही पुढे अतिशय यशस्वी ठरल्या. पण भक्ती आणि स्मिता पाटील अल्पायुषी ठरल्या, तर स्मिता तळवलकर पुढे कर्करोगाने देवाघरी निघून गेल्या.) याच दरम्यान सुप्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक स्व. श्याम बेनेगल यांनी स्मिताला बातम्या देताना पाहिले आणि त्यांना जाणवले, की ही मुलगी पुढे सिनेसृष्टीला खूप काही देऊन जाणार आहे.

Talegaon Dabhade : श्री मोरया गोसावी महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल हर्षल पंडित यांचे स्वागत

स्मिताचे भाग्य नक्कीच बलवत्तर होते. म्हणूनच तिला (Shapit Gandharva) श्याम बेनेगल सारख्या महान दिग्दर्शकाचा परिसस्पर्श झाला. त्यांनी तिला आपल्या ‘चरणदास चोर’ या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर पदार्पण करण्याची संधी दिली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिची कारकीर्द जेमतेम दहा वर्षांचीच होती; पण या एका दशकात तिने समांतर, व्यावसायिक, प्रादेशिक अशा विविध प्रांतात राज्य केले. तिने तब्बल 80हून अधिक चित्रपटांत काम करून आपले नाव सिनेसृष्टीच्या इतिहासात अजरामर केले. हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, मल्याळम् ,कन्नड अशा अनेकविध भाषांच्या चित्रपटांत तिने काम केले.

मराठीतले ‘जैत रे जैत’, ‘उंबरठा’ हे चित्रपट तिचेच म्हणून आजही रसिकांना आठवतात, तर आक्रोश, चक्र, मंथन, मिर्चमसाला या सारख्या आर्ट फिल्ममध्ये तिने शबाना आझमी, नसीरुद्दीन शहा, कुलभूषण खरबंदा यासारख्या महान अभिनेत्यांसमोर त्यांच्या तोडीस तोड जबरदस्त अभिनय करून रसिकांच्या हृदयात घर केले.

‘नमकहलाल’, ‘शक्ती’ सारख्या व्यवसायिक चित्रपटांत तिने महानायक अमिताभ समोर असतानाही आपल्या उत्तम अभिनयाची चुणूक दाखवली. 1985 साली तिला अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येऊन तिच्या कर्तृत्वाचा एक प्रकारे शासन दरबारी शाही गौरवच करण्यात आला.

अभिनयात अफाट प्रतिभावंत असलेली स्मिता वैयक्तिक आयुष्यात मात्र अबोल, काहीशी एकटी होती. तिला चर्चेत राहणे, गॉसिपिंग करणे अजिबात पसंत नव्हते. तिची व्यावसायिक कारकीर्द एकदम जोरात चालली होती. याच दरम्यान तिच्या आयुष्यात आला तिचा सहकलाकार आणि सुप्रसिद्ध अभिनेता राज बब्बर. खरे तर राज बब्बर आधीच विवाहित होता. त्याला नादिरा नावाच्या पत्नीपासून दोन अपत्येही होती. तरीही का आणि कसे तिलाच माहीत; स्मिता राजच्या प्रेमात आकंठ बुडाली. त्याचे विवाहित असणे, तो दोन मुलांचा बाप असणे या जगरहाटीला मान्य नसलेल्या गोष्टीही तिला मान्य होत्या. अतिशय बुद्धिमान, चतुरस्र असलेल्या स्मिताला आयुष्याचा निर्णय घेताना मात्र काहीच का कळाले नाही, या प्रश्नाने मनाला खूप वेदना होतात. स्मिताने अखेर राजसोबत विवाह केला आणि ती काहीच दिवसांत गरोदरही झाली. बाळंतपणात तिला खूप त्रास झाला अन् 13 डिसेंबर 1986 रोजी ती आपल्या बाळाला पोरके करून वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षीच देवाघरी निघून गेली.

त्या धक्क्याने अनेकांना खूप दुःख झाले. अनेक चर्चा, अफवा, आरोप- प्रत्यारोप झाले; पण त्याने स्मिता परत येणार नव्हती. त्यानंतर काही वर्षांनी सुप्रसिद्ध दिग्दर्शक मृणाल सेन यांनी एका मुलाखतीत स्मिताचा मृत्यू हलगर्जीपणामुळे झाला, असा आरोप केला. त्यावर तेवढ्यापुरती चर्चा झाली अन् ती लगेचच (Shapit Gandharva) विरलीही.

काळ सर्वांवर खूप मोठे अन् विलक्षण असे औषध आहे, असे म्हणतात ते खोटे नाही. उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या सिनेसृष्टीला अफाट, अद्भूत, दैवी देणं असलेल्या स्मिताचा विसर पडला नसता तरच नवल. अस्सल रसिकांच्या हृदयातले तिचे स्थान मात्र आजही तसेच अबाधित आहे. तिचा मुलगा प्रतीक आता खूप मोठा झाला आहे. तो आपले नशीब चित्रपटसृष्टीत आजमावत आहे. सोबतच आजोबांचा व्यवसायही सांभाळत आहे. इकडे राज बब्बर सिनेमासोबत राजकारणातही सक्रीय आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जिवाला कधी न कधी मृत्यू येणारच; पण तरीही काही जणांचे मृत्यू मनाला कायम वेदना देत राहतात. स्मिताचा मृत्यूही त्यातलाच.

कदाचित परमेश्वरालाच तिची स्वर्गात गरज भासली असेल. म्हणूनच त्याने तिला असे अकाली बोलावून घेतले असेल का हो? तुम्हाला काय वाटते? स्मिताच्या पावन आत्म्याला सद्गती मिळो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!

– विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.