Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख 37 वा – मासुम जुगल हंसराज

एमपीसी न्यूज : 1983 साली सुप्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी एक चित्रपट दिग्दर्शित केला होता ‘मासूम’ नावाचा. नसिरुद्दीन शहा, शबाना आझमी, तनुजा, सुप्रिया पाठक असे नामवंत आणि एकापेक्षा एक जबरदस्त कलाकार, पंचमदांचे आजही कानाला अवीट आनंद देणारे अप्रतिम संगीत, एकापेक्षा एक मधुर गाणी , सुप्रसिद्ध गीतकार गुलजार यांचे अतिशय हृद्य असे कथानक अन् याचसोबत दोन बालकलाकार यांचा अप्रतिम अभिनय, या सर्वांची भट्टी योग्यरित्या जुळून आल्याने या चित्रपटाने यशाचे सर्वच परिमाण गाठले होते. (Shapit Gandharva) यातल्या दोन बालकलाकारांपैकी एकीने बालपण सरल्यानंतर तारुण्यावस्थेत आल्यावरही आपल्या मादक सौंदर्याने अन् जबरदस्त अभिनयकलेने पुढील काही दशके आपल्या नावावर करून बालपणात मिळालेले यश केवळ नशिबाने मिळालेले नव्हते, हे सिद्ध केले. पण या चित्रपटाचा मुख्य नायक मात्र पुढे त्याच्याकडे यशस्वी होण्यासाठी सर्व काही असूनही पुढे मात्र यशस्वी ठरला नाही.

निळे डोळे, रोमँटिक हिरोसाठी लागणारा गोड चेहरा, उत्तम अभिनय, सुंदर व्यक्तिमत्व असलेल्या मासूमच्या ‘जुगल हंसराज’ला दैवाने पुढे मात्र यश का दिले नाही, या प्रश्नाला मला तरी उत्तर मिळाले नाही. 26 जुलै 1972 रोजी मुंबई येथे एका पंजाबी कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील प्रवीण हंसराज एक चांगले क्रिकेटपटू होते आणि त्यांनी बऱ्याच स्पर्धाही गाजवल्या होत्या. त्याचे बालपण मुंबई येथे आनंदात गेले.

वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्याला शेखर कपूरने आपल्या चित्रपटात काम दिले अन् जुगलने त्या चित्रपटातल्या आपल्या भूमिकेचे शब्दश: सोने केले. बालपणातच आईचं छत्र गमावलेल्या, बापाने दुसरे लग्न केलेले, पण चित्रपटात अशा काही चित्र-विचित्र गोष्टी घडतात की नसिरुद्दीन शहाला त्याला आपल्या घरी घेऊन यावेच लागते. जुगलला जरी नसीर आपला खरा बाप आहे हे माहीत नसले, तरी नसिरुद्दीन आणि शबानाला मात्र हे माहीत असते. (Shapit Gandharva) त्या घरातले त्याचे वागणे, कितीही नाही म्हटले तरी शबानाला तो आपला न वाटणे, पण त्याच्या निरागसतेमुळे शेवटी त्याला त्याचा हक्क मिळणे असे त्याकाळी आगळे-वेगळे कथानक असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शित होताच अवघ्या काहीच आठवड्यात सर्वानाच प्रभावित करून यशाचे मोठमोठे टप्पे गाठले होते. आजही हा चित्रपट जवळजवळ 40 वर्षांनी सुद्धा सर्वांना आठवतो आणि आजही आवडतो, यातच सर्व आले नाही का?

Pune : भरतनाट्यम्‌‍ नृत्य सादरीकरणातून घडले गुरू-शिष्य परंपरेचे दर्शन

साहजिकच जुगलच्या छबी अनेक मोठमोठ्या सिनेनियतकालिकांत येवू लागल्या. त्याला लहान वयातच खूप प्रसिद्धी आणि पैसाही मिळू लागला. पुढील काही वर्षांत त्याने शिक्षण घेता-घेता काही चित्रपटांत अन् काही जाहिरातींत कामही केले. कर्मा, सल्तनत हे त्याचे आणखी काही यशस्वी सिनेमे. एकंदरीतच जुगल हंसराज बालवयातच स्टार झाला होता. काळ आपल्या पावलाने झपाट्याने पुढे चालत होता. त्यातच 1994 साल आले. निर्माता सलीम अख्तरने आपल्या ‘आ गले लग जा’ या चित्रपटासाठी मासूमच्या त्या सुप्रसिद्ध बालजोडीला या चित्रपटात मुख्य नायक आणि नायिका म्हणून करारबद्ध केले. चित्रपटाचे दिग्दर्शन हमीद अली खान यांनी केले होते, तर अनु मलिकने संगीत दिले होते. परेश रावल, गुलशन ग्रोव्हर, अशोक सराफ, रीमा लागू अशा मोठमोठ्या कलाकारांसोबत जुगल हंसराज आणि उर्मिला मातोंडकर मुख्य भूमिकेत होते.

 

मासूमची बालकलाकार जोडी मुख्य भूमिकेत असल्याने या चित्रपटाची बऱ्यापैकी चर्चा झाली; पण चित्रपट फारसे यश काही मिळवू शकला नाही. त्यामुळे जुगलला या चित्रपटातून फारसा फायदा झाला नाही. यातली काही गाणी मात्र बऱ्यापैकी लोकप्रिय झाली होती. शीर्षक गीत, तेरे बगैर, आज हमें मालूम हुवा ही गाणी बऱ्यापैकी रसिकांच्या ओठावर होती. त्यानंतर आला त्याचा ‘पापा कहते है’ हा चित्रपट. (Shapit Gandharva) औरंगाबादची मयुरी कानगो(आठवते का?)ही त्याची हिरोईन होती. ‘घर से निकलते ही’ हे गाणे खूपच लोकप्रिय झाले होते. पण या चित्रपटाने त्याला हवे तसे यश काही मिळाले नाही. साहजिकच त्याला  पुढे चित्रपट मिळणे कमी झाले. ‘मोहब्बतें’ हा यशराज मूवीचा मोठया बॅनरचा चित्रपट त्याला मिळाला. यात कलाकारही खूप मोठमोठे होते.

महानायक अमिताभ ,किंग खान शाहरुख ,रूपसुंदरी ऐश्वर्या रॉय अशा मोठमोठ्या नावांचे वलय या चित्रपटाला लाभले होते. यालाही फारसे यश मिळाले नाही. हे खरे की हा चित्रपट अगदीच अपयशी ठरला नाही. पण जे काही यश मिळाले ते बॅनरला आणि अमिताभ, शाहरुख या नावालाच. (Shapit Gandharva) जुगलला याही चित्रपटाने काहीच फायदा झाला नाही. त्यानंतर त्याचा चित्रपट प्रवास आणखीनच खडतर होत गेला. आजा नच ले, कभी खुशी कभी गम, सलाम नमस्ते, कहाणी 2 असे चित्रपट त्याला मिळालेही; पण हवे तसे यश मात्र त्याला मिळाले नाही.

चॉकलेटी चेहरा आणि गोरागोमटा असलेल्या जुगलला मर्दानी सौंदर्य नव्हते. कदाचित हाच त्याला मोठा शाप ठरला. रांगडी शरीरयष्टी ,मर्दानी सौंदर्य या महत्त्वाच्या गोष्टी त्याच्याकडे नव्हत्या. पण फारुख शेख, भारतभूषण, प्रदीपकुमार यांच्याकडे तरी ते कुठे होते? उलट या सर्वांपेक्षा तो अभिनेता म्हणून नक्कीच सरस होता. पण… त्यानंतर त्याने स्वतःला दिग्दर्शकाच्या भूमिकेत आजमावून पाहिले. प्रियंका चोप्रा आणि उदय चोप्रा यांना घेऊन त्याने ‘प्यार इम्पॉसिबल’ नावाचा चित्रपट काढला. पण हा चित्रपटही फार काही यश त्याला देऊ शकला नाही. (Shapit Gandharva) अन् मग त्याच्यावर अपयशी असा शिक्का बसला तो बसलाच. दुर्दैवाने जगाच्या हिशोबात केवळ गुणवत्तेला फारशी किंमत नसतेच. यश,कीर्ती, पैसा,मान-सन्मान या गोष्टीही सोबत लागतातच. हळूहळू फिल्मी दुनियेला त्याचा विसर पडत गेला अन् तो बघता-बघता त्यांच्यासाठी अनोळखी होत गेला.

आता तो चित्रपटात काम करत नसला तरी धर्मा प्रॉडक्शनसोबत करारबद्ध असून त्याच्याकडे नवीन चित्रपटाच्या कथा, पटकथा निवडण्याची जबाबदारी आहे. त्याने 2014 साली आपली बालमैत्रीण जास्मिन धिल्लन सोबत लग्नगाठ बांधली आहे. त्याला 6 वर्षांचा अतिशय गोड असा मुलगा आहे. परमेश्वर एखाद्याला कधी तरी अशी काही अलौकिक देण देतो. त्यापायी त्याला जगातले सर्व सुख अनायासे मिळते. अन् एखाद्या क्षणी त्या व्यक्तीला ‘माझ्यासारखा मीच’ असे वाटायला लागते. नेमक्या त्याच क्षणी त्याच्या नशिबी सुख, समृद्धी लिहिलेल्या देवाला जाग येते आणि दुसऱ्याच क्षणी तो त्याला यशाच्या शिखरावरून अपयशाच्या खाईत ढकलून देतो. आता तो असे का करतो त्याचे त्यालाच माहिती. पण असे खेळ तो नक्कीच खेळतो, हे आपल्याला जुगल हंसराज सारख्या शापित गंधर्वाला वाचताना कळते आणि लगेचच पटतेही, नाही का?

जुगल हंसराजचे उर्वरित आयुष्य सुखी आणि आनंदाचे जावो, अन् कळत नकळत परमेश्वराने त्याच्यावर केलेला अन्याय न्यायात बदलो,हीच त्याच्याचरणी प्रार्थना!

विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.