Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख 13 – क्रिकेटपटू अमोल मजूमदार

एमपीसी न्यूज : असे म्हटले जाते, की त्याच्याकडे (Shapit Gandharva) एका क्रिकेट परिपूर्ण क्रिकेटपटूकडे असायला हवेत. ते सर्व फटके होते. त्याच्यात गुणवत्ता ठासून भरलेली होती. मोठमोठ्या विक्रमाला नेस्तनाबूत करायचे सर्व सामर्थ्य त्याच्या बॅटमध्ये होते. तो खेळायला आला, तेव्हा आणखी एक नवीन तेंडुलकर उदयाला आलाय, असे म्हटले गेले. जे-जे त्याच्याबाबत म्हटले गेले, ते बऱ्यापैकी खरेही होते. तो भारतीय क्रिकेट संघाकडून दीर्घकाळ क्रिकेट खेळणार, हे त्याच्या बाबतीत वर्तवलेले भाकित मात्र कधीही खरे होऊ शकले नाही.

कारण सदैव सातत्य दाखवूनही, देशांतर्गत स्पर्धेत खोऱ्याने धावा जमवूनही त्याच्या भाळावर कसोटीपटू हा टिळा लागला नाही तो नाहीच. त्याच्यापेक्षा गुणवत्तेने कितीतरी मागे असूनही अनेक नर्मदेचे गोटे कसोटीपटू म्हणून खेळले आणि आपल्या त्या गुणवत्तेचे जाहीर प्रदर्शन झाल्यावर आले कधी नी गेले कधी हे समजण्याआधीच अदृश्यही झाले. पण याच्या नशिबी कधीही हे भाग्य आलेच नाही.

होय! ‘अमोल अनिल मजूमदार’. रणजी स्पर्धेत धावांची टांकसाळ खोलणारा हा मुंबईचा प्रतिभावंत फलंदाज, रमाकांत आचरेकर सरांचा शिष्य. महान फलंदाज आणि खेळाडू सचिन तेंडुलकरचा गुरुबंधू अमोल मजुमदारने न जाणो किती वेळा राष्ट्रीय संघाच्या दरवाजाची कडी ठोठावली. पण, त्याला प्रचंड गुणवत्ता देणाऱ्या वरच्या त्या सर्वसाक्षी परमेश्वराने त्याच्या भाळी संधी न लिहिल्याने त्याची दखल कधीही त्या दरवाजाआड असणाऱ्या निवड समितीच्या सदस्यांनी नाहीच घेतली.

क्रिकेटमधला कुठलाही समीक्षक अमोल मजुमदारला संघात का घेतले गेले नाही? याबद्दल कधीही ठोस कारण देवू शकला नाही. त्याला केवळ नशिबाने साथ न दिल्याने तो कधीही भारतीय क्रिकेट संघाचा भाग होवूच शकला नाही.

Manobodh by Priya Shende Part 80 : मनोबोध भाग 80 – धरा श्रीधरा त्या हरा अंतराते

11 नोव्हेंबर 1974 साली जन्माला आलेल्या अमोलचे (Shapit Gandharva) वडील अनिल मजूमदार हे ‘बँक ऑफ बडोदा’मध्ये नोकरीस होते आणि ते स्वतः एक चांगले फलंदाज होते. त्यांनी बँकेच्या अनेक सामन्यातून संघाचे प्रतिनिधित्व केले. साहजिकच अमोलच्या घरात क्रिकेटचेच वातावरण होते. वडिलांसोबत अनेकदा त्याला कसोटी सामने बघायला जायला मिळत असे. त्याला शारदाश्रम शाळेत पुढील उच्च शिक्षणासाठी घालण्यात आले. इथेच त्याच्याबरोबर सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी हे सुद्धा शालेय सहकारी होते.

फार कमी लोकांना हे माहीत असेल, की ज्या सामन्यात सचिन आणि विनोदने ती जगप्रसिद्ध भागीदारी केली होती. त्याच सामन्यात अमोल मजुमदारही होता आणि तो पॅड बांधून आपल्या खेळीची वाट बघत होता. त्याला शेवटपर्यंत वाटच बघावी लागली; कारण ही जोडी बादच झाली नाही. तशीच वाट त्याला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी बघावी लागली, जी कधीही फलद्रूप झाली नाही. पण, त्याने प्रयत्न सोडले नाहीत. तो देशांतर्गत स्पर्धेत धावांची रास रचत राहिला; पण गांधारीसारखी डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या निवड समितीच्या सदस्यांनी त्याच्या विक्रमाकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्याने आपल्या पदार्पणातल्या रणजी सामन्यात मुंबई संघाकडून खेळताना हरयाणा संघाविरुद्ध 1993 साली पहिल्याच सामन्यात 260 धावांची ऐतिहासिक खेळी करून इतिहास रचला होता, जो पुढील कित्येक वर्षे अबाधित होता. 2018 साली अजय रोहिराने तो विक्रम मोडला. तोवर तो विक्रम अमोलच्याच नावावर कायम होता.

कोटा सिस्टीम, मुंबईच्या संघातले सचिन, कांबळी, आगरकर, प्रवीण आमरे असे आधीच संघात असलेले खेळाडू यामुळे अमोलला संघात स्थान मिळालेच नाही. कोटा सिस्टीम लक्षात घेऊन त्याने मुंबई संघ सोडून आसाम, आंध्र प्रदेश इ. संघांतून खेळून स्वतःचे नशीब आजमावून पाहिले. पण, हाय रे दुर्दैवा! त्याला त्यातही यश मिळाले नाही. अखेर 2013 साली त्याने निवृत्त होण्याचे ठरवले आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पण त्यापूर्वी त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते. त्याने 171 रणजी सामने खेळून 11 हजार 167 धावा केल्या होत्या, ज्यात 30 शतके आणि 60 अर्धशतके सामिल होती. त्याने मुंबई संघाचे नेतृत्व सुद्धा केले, पण तो भारतीय संघात कधीही येवू शकला नाही, याचे दुःख त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात सच्च्या क्रिकेटप्रेमीला आजही छळते. याचाच अर्थ तो नक्कीच एक उच्च दर्जाचा खेळाडू पण एक शापित गंधर्व (Shapit Gandharva) होता, हेच सिद्ध करत नाही का?

निवृत्तीनंतर अमोल आपला वेळ कोचिंगसाठी देत आहे. त्याच्या हातून त्याच्यासारखेच उच्च दर्जाचे आणि सचिन तेंडुलकरसारख्या नशिबाचे असंख्य क्रिकेटपटू निर्माण होवोत आणि त्याच्या असंख्य शिष्यांना देशाचे प्रतिनिधित्व करायची संधी मिळो, हीच परमेश्वराकडे प्रार्थना!

– विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.