Mumbai : संचालक सोडाच राज्य सहकारी बँकेचा साधा सभासदही नाही, दौऱ्यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे कारवाई – पवार

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केल्याची मला माहिती नाही. असा काही गुन्हा दाखल करण्यात आला असेल तर मी त्याचे स्वागतच करतो, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. मी कधीही कोणत्याही बँकेचा संचालक नव्हतो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या दौऱ्यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळेच ही कारवाई करण्याची वेळ आली असावी, अशी टीकाही त्यांनी केली.

पवार म्हणाले की, राज्य सहकारी बँकेचा मी कधीही संचालक नव्हतो. राज्य सहकारी बँकच काय कोणत्याही बँकेचा मी साधा सदस्यही नव्हतो. या बँकेच्या कारभारात आपण कधीही लक्ष घातले नाही तरीही विनाकारण मला त्यात गोवण्यात येत आहे. राज्यात सत्ता परिवर्तनची हवा असून माझ्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे माझ्यावर अशी कारवाई झाली नसती तर आश्चर्य वाटले असते, असा टोला पवारांनी लगावला. कोणताही संबंध नसताना या घोटाळ्यात आपल्याला गोवण्यात आल्याचे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे, त्याचे काय परिणाम होतील हे लवकरच दिसेल, असा सूचक इशाराही पवार यांनी दिला.
सहकारी बँका अडचणीत आल्यानंतर त्यांना मदत करणं, अडचणीतून बाहेर काढणे हा काही गुन्हा होत नाही, असे पवार म्हणाले. राज्य सहकारी बँकेच्या संचालकांनी चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप केल्याची तक्रार अर्जदाराने केली होती. हे बँकेचे अधिकारी शरद पवार यांच्या जवळचे असल्याचे अर्जदाराने म्हटले होते. अशा प्रकारे माझा उल्लेख आल्यामुळे माझ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असेल तर मी धन्यवादच देतो, असा शेरा पवार यांनी मारला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.