Shirur: ‘अस्सल सोन्याला आगीची भीती नसते’; डॉ. अमोल कोल्हे यांचे आढळराव यांना प्रत्युत्तर

संपत्तीच्या वादाला दिले जोरदार प्रत्युत्तर

एमपीसी न्यूज – शिरुरचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेसाठी पुणे जिल्ह्यातील एका खासदाराला मदत मागितली. परंतु, त्या खासदाराने ती दिली नव्हती. तो खासदार कोण हे सातत्याने विचारुन देखील कोल्हे यांनी खासदाराचे नाव जाहीर केले नव्हते. मात्र संपत्तीचा विषय आला की शिरुरचे शिवसेनेचे खासदार जेवढ्या तत्परतेने या विषयावर प्रत्युत्तर देताना दिसतात. याच नेमके कारण स्वतः शिवसेनेच्या खासदारांनाच ठाऊक असेल. हा नक्की ‘चोराच्या मनात चांदणं’ असा तर प्रकार नाही आहे ना ? असा प्रश्न उपस्थित करीत अप्रत्यक्षरित्या मालिकेला मदत न करणारे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव हेच असल्याचे डॉ. कोल्हे यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी तगडे आव्हान निर्माण केल्याने बेभान झालेले शिवसेनेचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव आणि त्यांचे कार्यकर्ते कोल्हे यांना टार्गेट करत आहेत. त्यांच्या संपत्तीवरुन वाद निर्माण केले जात आहे. त्याला कोल्हे यांनी पत्रक जाहीर करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

या पत्रकात डॉ. अमोल कोल्हे म्हणतात, आढळरावांचे लावारीस अंध भक्त माझ्यावर आरोप करताना देवाने दिलेल्या मेंदूचा बिलकुल उपयोग करताना दिसून येत नाहीत. डॉ. अमोल कोल्हे यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता दोन्ही मिळून चार कोटीच्या आसपास आहे. यातील स्थावर मालमत्ता वडिलोपार्जित असून सरकारी नियमांनुसार त्यांची चालू बाजारभाव किंमत देण्यात आली आहे. डॉ. अमोल कोल्हे मुंबई मधील घराचे जॉईंट ओनर असून त्यांच्या पत्नी सुद्धा घराच्या मालक आहेत आणि त्यांनी ते सारस्वत बँक मधून गृहकर्ज घेऊन खरेदी केले आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी कधीही सांगितल नव्हते की त्यांनी शिवसेनेच्या खासदाराकडे मदत मागितली म्हणून, ते पुणे जिल्ह्यातील एक खासदार असे नेहमी म्हणाले. परंतु, शिवसेनेचे खासदार जेवढ्या तत्परतेने या विषयावर प्रत्युत्तर देताना दिसतात याचं नेमके कारण स्वतः शिवसेनेच्या खासदारांनाच ठाऊक असेल. हा नक्की ‘चोराच्या मनात चांदणं’ असा तर प्रकार नाही आहे ना ? असे विचारत मालिकेला मदत न करणारे खासदार आढळराव हेच असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे.

राहिली गोष्ट डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतःहून कधीच घर विकल्याचं भांडवल केलं नाही. त्यांच्या रेकॉर्ड झालेल्या फोन कॉल मधून आपल्या सर्वाना ही गोष्ट समजली. त्यांनी स्वतःही कधी कुठल्याही व्यासपीठावरून ही गोष्ट सांगून भांडवल केले नाही किंवा करणार पण नाहीत. आढळराव तुमच्या आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या संस्कृतीमध्ये खूप फरक आहे ते आम्ही कित्येक वेळा पाहिल. मग ते जातीचा उल्लेख असो किंवा स्टेजवर महाराजांच्या पुतळ्यासमोर चपला घालून बसणं असो !

अढळसेना संभाजी महाराज आणि अमोल कोल्हे यांचा एवढा तिरस्कार करते की त्यांनी सिरीयल बंद व्हावी व अमोल कोल्हेंवर कारवाई व्हावी म्हणून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. यांना अमोल कोल्हे यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का ? शिवसेनेकडे प्रचारासाठी शिरूरच्या विकासासाठी कोणताही ठोस कार्यक्रम नाही. म्हणून ते डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर वैयक्तिक आरोप करून जनतेची दिशाभूल करतायेत. आढळरावांना शिरूरच्या जनतेला स्वतःचे कर्तृत्व सांगण्यासारखे काहीच नसल्याने आणि त्यांना पराभव स्पष्ट दिसू लागल्याने अशा वैचारिक दिवाळखोरीतून ते आता चाललेले आहेत. देव त्यांना मानसिक स्वास्थ्य देवो! अस्सल सोन्याला आगीची भीती नसते जेवढी आग जास्त, तेवढी झळाळी जास्त ! असे पत्रात म्हटले आहे.

ता.क. डॉ. अमोल कोल्हे यांनी विकलेल्या घराचा पत्ता
K-10 आंबेकरनगर
परळगांव, मुंबई 12
स्थानिक नगरसेवक आमदार खासदार शिवसेनेचे आहेत, हवे असल्यास खात्री करून घ्यावे. असेही पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.