ED Action on Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबई, आलिबागमधील मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई

एमपीसी न्यूज – अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांची दादर आणि अलिबाग येथील मालमत्ता जप्त केली आहे. एक हजार 34 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली असल्याचे म्हटले जात आहे.

दादर येथील संजय राऊत यांचा फ्लॅट आणि अलिबाग येथील आठ प्लॉट ईडीने जप्त केले आहेत.

ईडीच्या कारवाईनंतर खासदार संजय राऊत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ईडीने अलिबागमधील जी जमीन जप्त केली आहे, ती आम्ही 2009 साली कष्टाच्या पैशातून विकत घेतली होती. परंतु ईडीने कोणतीही चौकशी न करता या जमिनी जप्त केल्या आहेत तसेच ईडीने आम्ही सध्या वास्तव्याला असलेला दादरमधील फ्लॅटही जप्त केला असल्याचे संजय राऊत म्हणाले.

यापैकी एकही मालमत्ता आर्थिक गैरव्यवहारातून घेतली असल्याचे सिद्ध झाले तर आम्ही ही सर्व संपत्ती भाजपला दान करू, असेही संजय राऊत म्हणाले. माझं मुंबईतील राहतं घर आणि अलिबागमधील 50 गुंठ्यांची जमीन याला काही संपत्ती म्हणता येणार नाही. अशा कारवायांमुळे संजय राऊत किंवा शिवसेना झुकणार नसल्याचे राऊत म्हणाले.

मी आज दिल्लीतील ज्या घरात राहत आहे, त्या ठिकाणी येऊन भाजपच्या नेत्यांनी सरकार पाडण्यासाठी मदत करा अन्यथा परिणाम चांगले होणार नाही, अशा धमक्या दिल्या होत्या. ईडीने संपत्ती जप्त करण्यापूर्वी कोणतीही माहिती दिली नव्हती, असेही राऊत यांनी सांगितले.

याबाबत संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. त्यात केवळ ‘असत्यमेव जयते’ असे म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.