Lohgad : लोहगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा!

एमपीसी न्यूज : ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी शके 1944 अर्थात, रविवार दि. 12 जून रोजी लोहगड (Lohgad) येथील शिवस्मारकावर शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने शिवस्मारकावर सुंदर सजावट करण्यात आली होती.

शिवस्मारक पूजन व अभिषेक जगद्गुरू संत तुकोबारायांचे 11 वे वंशज व शिवशंभू विचार मंच प. महाराष्ट्र प्रांत संयोजक ह.भ.प. शिरिष महाराज मोरे यांचे हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ग्रामपुरोहित प्रभाकर दिघे गुरुजींनी मंत्रोच्चाराने शास्त्रोक्त पद्धतीने अभिषेक संपन्न केला.

ह.भ.प. मोरे महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही अशा स्वराज्यावरील चौफेर आक्रमणाविरुद्ध शिवाजी महाराजांनी सह्याद्रीमधील मावळ्यांना सोबत घेत लढा देऊन देव, देश व धर्माचे संरक्षण केले. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला व हिंदू पद पादशाहीची स्थापना झाली. शिवाजी महाराजांच्या रूपाने सार्वभौम हिंदू राजा म्हणून लाभला. हा दिवस म्हणजेच “हिंदूसाम्राज्य दिन” होय!

हा सुवर्णक्षण ( Lohgad ) साजरा करण्यासाठी रमेश बैकर, शंकर चिव्हे, राजू शेळके, पोपट दिघे आदी लोहगड घेरेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. मोरे महाराजांचा सन्मान गणेश धानिवले (चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी ), सचिन गोरडे(पोलीस पाटील), गणपत ढाकोळ (उपसरपंच ) आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ध्येय मंत्र व प्रेरणा मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे नियोजन संस्थापक सचिन टेकवडे,मार्गदर्शक संदीप गाडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर,कार्याध्यक्ष सागर कुंभार, अनिकेत आंबेकर,अमोल गोरे, बसप्पा भंडारी, अमोल मोरे, राहुल वाघमारे, महेंद्र बैकर, सोमनाथ बैकर आदी कार्यकर्त्यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.