Kolhapur News : धक्कादायक ! कोल्हापूरात पाच वर्षीय मुलाचा हळद, कुंकू, गुलाल टाकून खून ; नरबळीचा संशय

एमपीसी न्यूज – कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पाच वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या बालकाच्या मृतदेहावर हळद, कुंकू, गुलाल आढळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. शाहुवाडी तालुक्यातील कापशी येथे आज (मंगळवारी) पहाटे हा  प्रकार उघडकीस आला आहे.

कोल्हापूरमधील एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी सायंकाळी हा मुलगा मैदानावर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला, नातेवाईकांनी शोध घेतला पण तो सापडला नाही. अखेर मुलांच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली व मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. सोमवारी देखील नातेवाईकांनी मुलाचा शोध घेतला पण त्याचा काहीच पत्ता लागला नाही.

आज (मंगळवारी) पहाटे मुलाचा मृतदेह आढळून आला. मुलाच्या मृतदेहावर हळद, कुंकू, गुलाल टाकण्यात आला असून, हा नरबळी असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.