Pimpri News : तडीपार आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धमकी

एमपीसी न्यूज – जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आरोपीने कोयता दाखवत धमकी दिली. ‘आज पंगा नाही घ्यायचा नाहीतर विकेट’, अशी धमकी देत आरोपीने सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अतुल उर्फ चांड्या अविनाश पवार (वय 28, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक शहाजी धायगुडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत आला असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार फिर्यादी आणि त्यांचे सहकारी पोलीस आरोपीला पकडण्यासाठी गेले.

आरोपी अतुल याने कोयता जवळ बाळगून पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबत झटापटी केली. त्यानंतर कोयता हातात घेऊन ‘आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट’ असे म्हणून पोलिसांच्या अंगावर धावून गेला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर ‘आज दिवस तुमचा आहे. उद्या काय करणार. तुम्हाला मीच पुरा पडणार’ असे म्हणून शिवीगाळ करून पोलिसांना धमकी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.

पोलिसांना जीवे मारण्याची धमकी देणा-या आणखी एका तडीपार आरोपीला बेड्या

हर्षल उर्फ गब-या रामदास पवार (वय 28, रा. नेहरूनगर, पिंपरी) याला पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत  त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांची कॉलर पकडून त्यानेही झटापटी केली. तसेच पोलीस शिपाई विकास रेड्डी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलीस शिपाई रेड्डी यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक चाटे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.