Chinchwad News: गुरुद्वारा परिसरातील नागरी समस्या मार्गी लावा – सूरज बाबर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या नागरी समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी कृषी, पर्यावरण, शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेचे अध्यक्ष सूरज बाबर यांनी महापालिकेकडे केली.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात बाबर यांनी म्हटले आहे की, गुरुद्वारा परिसर, वाल्हेकरवाडीतील नागरिकांना व लहान मुलांना गार्डनची उपलब्धता करून देण्यात यावी. गुरुद्वारा चौक ते ममिली कार्यालय/ चंदन स्वीटरोड या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्टॉर्म वॉटर लाईन टाकून देण्यात यावी. वास्तविक रस्ता करतानाच ही लाइन टाकणे गरजेचे होते. गुरुद्वारा परिसरातील ज्या स्ट्रीट लाईट सोडियम वेपर मध्ये असतील त्या एलईडी मध्ये कन्वर्ट कराव्यात जेणेकरून विजेची बचत होईल.

साई हौसिंग सोसायटी, सरोवर हौसिंग सोसायटी ,स्वप्ननगरी सोसायटी ,भारत माता सोसायटी यांच्या लगत जाणाऱ्या नाल्यावर स्लॅब टाकून मिळावा. गुरुद्वारा कॉलनी ते राजयोग कॉलनी आरसीसी पाईप टाकून रस्ता करून द्यावा. गुरुद्वारा परिसरातील सर्व सोसायट्यांचे रोड चेक करून डांबरीकरण करून घेण्यात यावे. गुरुद्वारा परिसरातील रेल्वे लाईनच्या टनेल खाली वर्षानुवर्ष पावसाळ्यामध्ये पाणी साठते. त्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. त्यावर तात्काळ कार्यवाही करावी. गुरुद्वारा परिसरातील सर्व सोसायटींचे सर्वेक्षण करून पावसाळ्यामध्ये पाणी साठणार नाही. याची दक्षता घ्यावी तसेच ज्या ठिकाणी पाणी साठत असेल त्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बाबर यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.