Talegaon News : सोमाटणे टोल नाका बंद करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय नेते एकत्र; 10 एप्रिल रोजी आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज – जुना पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोल नाका अनधिकृत असून आयआरबीने टोलनाका त्वरित बंद करावा, अशी मागणी करत तळेगाव दाभाडे शहर परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र आले आहेत. टोलनाका बंद करण्याबाबत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 10) आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सर्वपक्षीय पदाधिका-यांची सोमाटणे येथे बैठक झाली. यावेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे, मिलिंद अच्युत, कल्पेश भगत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, गणेश काकडे, अरुण माने, आशिष खांडगे, शिवसेना शहर प्रमुख दत्ता भेगडे, देव खरटमल, मुन्ना मोरे, मनसेचे नेते सचिन  भांडवलकर, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संतोष दाभाडे, शहराध्यक्ष रवींद्र माने, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर आदी उपस्थित होते.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी सोमाटणे टोलनाका अनधिकृत असल्याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात कागदपत्रे सादर केली. त्यानंतर एमएसआरडीसी आणि आयआरबीच्या पदाधिका-यांनी सोमाटणे टोलनाक्याबाबत सर्व कागदपत्रे दोन दिवसात सादर करण्याचे आश्वासन दिले.

सोमाटणे टोलनाका अनधिकृत आहे, तो त्वरित हटवावा अथवा टोलनाका अनधिकृत कि अधिकृत याबाबत निकाल लागेपर्यंत टोलनाका बंद ठेवावा, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिका-यांनी केली. दोन दिवसात आयआरबी आणि एमएसआरडीसीचे म्हणणे ऐकून त्यानंतर रविवारी (दि. १०) रोजी होणा-या आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.