Special Article On Covid : ‘कोविड’मधून बरे होताना…!

एमपीसी न्यूज : (हर्षल आल्पे) सध्या खर तर सगळीकडेच एक प्रकारचे दडपण आहे, एखाद्याला कोरोंना झाला की, पहिली प्रतिक्रिया हीच असते, “ बापरे” आता पुढे काय होणार ? हाच प्रश्न सगळीकडे विचारला जातो, मग वेगवेगळे उपाय (आपल्याला माहीत असलेले किंवा नसलेले) सांगितले जातात.

समाज माध्यमावर या कोरोंना विषयी अनेको गोष्टी तश्या मागच्या वर्षी पासूनच येऊन गेल्या, काही त्यातल्या खर्‍या जरी मानल्या, तरी अनेक गोष्टी या आपल्या गोंधळात भर टाकणार्‍याच होत्या, आणि हाच गोंधळ आपल्या मनावर आघात व्हायला सुद्धा कारणीभूत ठरतो.

खरे तर आपल्या शाररिक आरोग्यावर आपले मानसिक आरोग्य नेहमीच प्रभाव पाडत असते, बघा तुम्ही ! एखाद्या गोष्टीची भीती मनात, मेंदूत बसली की ती गोष्ट जर काही कारणाने आली की सर्वात पहिल्यांदा आपले शरीर त्यावर प्रतिक्रिया देते. आणि इथेच खरी मेख आहे.

आपल्याला कोरोंना झालाय हे ज्या दिवशी, ज्या वेळी कळते, ती वेळ फार म्हहत्वाची असते, कारण त्या नंतर आपण स्वतः आणि इतर आपल्याशी संबंधित समाज एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश करत असतो, एक प्रकारचे ते एक स्थित्यंतरच असते, हा होणारा बदल, पडणारा प्रभाव हा प्रत्येकजण आपआपल्या जगण्याच्या आणि स्वभावानुसार घेत असतो.

काही जण खूप नकारात्मक पद्धतीने घेतात, तर काही जण सुरवातीला गंभीर नसताना नंतर मात्र खूप च गांभीर्याने घेताना दिसतात. जे खूप च नकारात्मकतेने घेतात, त्यांना हळूहळू इतर व्याधी ही फार लवकर जडतात, आणि त्याच व्याधी वाढल्यावर मानसिक आणि शाररिक आरोग्याची सरमिसळ होऊन, गुंतागुंतीने मृत्यूही होऊ शकतो ….

आणि दुर्दैवाने आज अशी उदाहरणे फार वाढलीयेत, फार कमी वयात कोरोनाने मृत्यू होणार्‍यांची संख्या आज फार वाढलेली दिसते, या वर समाज म्हणून आज खर तर चिंतन करण्याची गरज आहे, आरोग्य सुविधेचा प्रश्न गंभीर आहेच, त्याच बरोबरीने आपण समाज म्हणून कुठे चुकत तर नाही आहोत ना, या वर विचार करण्याची गरज आहे …

एक साधे उदाहरण की, एखाद्याला कोरोना झाला, तो आयसोलेट झाला, भले तो घरीच आयसोलेशनमध्ये असेल, त्यानंतर आपण मौखिक प्रकारचा (फोन , मेसेज वैगरे ) संवादही त्याच्या बरोबरचा बंद करून टाकतो, जसे काही त्या संवादानेही कोरोना आपल्याला होईल, या भीतीने आपण बोलत नाही आणि इथेच आपण समाज म्हणून चुकतो…

आणि एखाद्याची गेल्याची बातमी आल्यावर समाज माध्यमात त्याच्याविषयी आपल्या भावना व्यक्त करतो, ती भावना कितीही खरी असली, तरी तो असताना त्याच्याशी जर शक्य तसा संवाद करून त्याला थोडासा दिलासा मिळेल अश्या पद्धती ने बोलल्यास नक्की फरक पडतो…

कधी कधी “कसा आहेस रे ?” हा प्रश्नही खूप दिलासा देऊन जातो, “बरा आहेस ना बाबा” या प्रश्नाने तर मन म्हणून आपण बरे होण्याची हमी मिळते. जगण्यासाठी दहा हत्तींचं बळही मिळते, आलेल्या संकटाला हसत सामोरे जाण्यासाठी हा एकच प्रश्न कामी येतो, फक्त तो वेळच्या वेळी विचारला गेला पाहिजे… नाही तर काही लोक कोविड रुग्णाशी बोलताना आपले भान आणि अक्कल बाजूला ठेऊन, या रोगाने कोण कोण गेले याची यादीच काढतात आणि समोरच्याला मानसिकरित्या अजूनच खच्ची करतात.  इथे औचित्याचा भंग होतो हे त्यांच्या लक्षातच येत नाही.

त्याच्यात काही दिव्य असे असतात की, “कोरोना सगळ्यांनाच होणार आहे,” असे भविष्यही वर्तवून  जातात.

अशा तर्‍हेने आजूबाजूला खूप नकारात्मक वातावरण असताना त्या नकारात्मकतेपासून स्वत:ला वाचवण्याचे आव्हान खरे तर कोविड रुग्णासमोर असते, भविष्याबद्दल त्याला खूप घाबरवून सोडले जाते, एकदा कोविड झाल्यावर, पुढे असे होते, तसे होते, मेंदूवर परिणाम होतो, वैगेरे वैगेरे समाज माध्यमांवर रोज वेगवेगळी थियरी मांडली जाते , या थियरीपासून खरे तर आज कोविड झालेल्या मित्र-मैत्रिणींनी लांब राहिले पाहिजे .

पुढचे पुढे बघू हा स्वभाव इथे कामी येऊ शकतो, याच संदर्भात विचार करत असताना एका अभिनेत्याची मुलाखत पाहण्यात  आली, जो एका गंभीर गुन्ह्याखाली तुरुंग भोगून आला होता, आणि ज्याच्या आयुष्यावर चित्रपटही येऊन गेला, तो असे म्हणतो, “जिंदगी के उस दौर मे , मैंने एक चीज़ सीखी , के होप ही मत रखो भविष्य को लेकर, फिर सारी चीजे आसान हो जाएगी !” त्याच्या या वक्तव्यात तो किती मोठी गोष्ट बोलून गेला, आपण खूप भविष्याचा विचार करून स्वत:ला त्रास करून घेतो.

विशेषत: कोविडशी लढताना तर ही गोष्ट विशेषत्वाने लक्षात घेतलीच पाहिजे की, भविष्याला घाबरायचे नाही. आजमध्ये जगायचे, आज मला बरे व्हायचे आहे, आणि एकदा बरे व्हायला लागल्यावर शरीराला आणि मनाला पुरेसा वेळ हा दिलाच गेला पाहिजे, मनाला दुसर्‍या कुठल्याच काळजीत न टाकता, आयुष्य जसे येईल, तसे स्वीकारले पाहिजे. क्रिकेट खेळाप्रमाणे चेंडू समोर येईल तशा पद्धतीने त्याला खेळले पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचे!

कोरोना हा फक्त एक रोग आहे. भले तो साथीचा असला तरी तो एक विषाणू आहे. त्याला न घाबरता योग्य उपचार घेऊन सकारात्मक राहून त्याचा मुकाबला केला पाहिजे, हेच खरे ….!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.