Pune News : स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची चार मार्चला निवडणूक

एमपीसी न्यूज – स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्या अध्यक्षपदाचा एक वर्षाचा कालावधी संपत असल्याने येत्या 4 मार्च रोजी स्थायी समितीच्या नवीन अध्यक्षपदासाठी निवडणुक होणार आहे. महापालिकेची मुदत 14 मार्च रोजी संपत असल्याने नवीन अध्यक्षांना केवळ दहा दिवस काम करण्याची संधी मिळणार आहे.

स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत 1 मार्च रोजी संपणार असल्याने नुकतीच नवीन आठ सदस्यांची निवड करण्यात आली. आता अध्यक्षपदाचीही मुदत संपत असल्याने या पदासाठीही निवडणूक घ्यावी लागणार असून, त्यासाठी विभागीय आयुक्तांनी पत्र पाठवले आहे. त्यानुसार अध्यक्षपदाची निवडणूक चार मार्च रोजी दुपारी एक वाजता घेण्याच्या सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. त्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांचे नाव देण्यात आले आहे.

ही निवडणूक चार तारखेला होणार असली तरी या पदासाठी अर्ज मागण्याची, त्याची छाननी करण्याची आणि अर्ज माघारी घेण्याची तारीख अद्याप महापालिकेने निश्‍चित केली नाही. शक्‍यतो शुक्रवारी याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती प्रभारी नगरसचिव शिवाजी दौंडकर यांनी दिली.

निवडणुकीचे वर्ष असल्याने जेमतेम दोन महिने अध्यक्षपदाच्या कामकाजासाठी मिळणार आहेत. स्थायी समितीचे सध्याचे अध्यक्षपदी हेमंत रासने आहेत. दरम्यान, या पदासाठी कमी कालावधी मिळणार असल्याने पुन्हा त्यांनाच संधी मिळेल की अन्य कोणाची वर्णी लागेल हे देखील अर्ज दाखल केल्यानंतर समजणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.