Pune News : कागदोपत्री अद्याप तीन लाख नागरिकांनी घेतला नाही डोस ; प्रत्यक्षात आठ ते दहा लाख शिल्लक

एमपीसी न्यूज – शहरातील सर्व लाभार्थी नागरिकांचा करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस झाला आहे; परंतु अद्याप सर्व लाभार्थ्यांचा दुसरा डोस पूर्ण झाला नाही. कागदोपत्री तीन लाख लाभार्थ्यांचे डोस राहिले असले, तरी प्रत्यक्षात आठ ते दहा लाख जणांचे डोस घेणे राहिले आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने पुण्यातील लाभार्थ्यांची संख्या 33 लाख अपेक्षित धरली आहे. मात्र प्रत्यक्षात ती 37 ते 38 लाखांपर्यंत आहे. त्यातून ग्रामीण भागातून आणि पिंपरी-चिंचवड मधून पुणे शहरात येऊन लस घेणाऱ्यांचीही संख्या जास्त होती. त्यामुळे प्रत्यक्षात ही आकडेवारी जास्त आहे.

पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या पाहता दुसरा डोस घेणारेही तितकेच असणे साहजिकच अपेक्षित आहे. त्यामुळे त्यासाठीही 37-38 लाख डोस मिळणे अपेक्षित आहे. परंतु केंद्राने 33 लाखच धरल्याने तेवढेच डोस जर दुसऱ्या डोससाठी मिळाले तर अन्य नागरिकांचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

केंद्राने लाभार्थ्यांच्या संख्येनुसार नियोजित केलेले डोस तेवढी लाभार्थी संख्या पूर्ण झाली की, देणे बंद करणार का, केले तर उरलेल्या लाभार्थ्यांचे काय, हा प्रश्‍नही या निमित्ताने निर्माण झाला आहे. तसे झाले तर किमात सात लाख नागरिक दुसऱ्या डोसपासून वंचित राहू शकतील.

दरम्यान पुणे महापालिकेचे लसीकरण विभाग प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, भविष्यात हा प्रश्‍न निर्माण होऊ शकणार आहे. लाभार्थ्यांची गृहित धरलेली संख्या संपली तर लसीचा कोटा येणार नाही. गोव्यामध्ये लसीकरण पूर्ण झाले असे गृहित धरून ते बंद केले आहे. परंतु आपल्याकडे अद्याप दुसरा डोस पूर्ण झाला नाही. याविषयी राज्यसरकारला कळवले जाईल आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.