Ravet News : पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा सुरळीत करा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत राहण्यासाठी तात्काळ उपायायोजना कराव्या. ज्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्याच्या समस्या निकालात निघतील, अशी सूचना भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत महावितरण प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिका पवना नदीवरील रावेत बंधारा येथून अशुद्ध जलउपासा करीत आहे. त्यासाठी 20 पंप असून, तेथून पाईपलाईनद्वारे निगडी प्राधिकरण येथील सेक्टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. रावेत बंधारा व निगडी जलशुद्धीकरण केंद्र या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र वीजपुरवठा आहे. त्यामुळे एका ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला तरी शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो.

दोन दिवसांपूर्वी वीज खंडित झाल्याने अनेक ठिकाणी पाणीपुरवठा न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. अशाप्रकारे वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी पुरवठ्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे संबंधित पंपिंग स्टेशनमधील वीज पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत ठेवण्यासाठी तोडगा काढवा, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

वीज समस्येमुळे अनेक भागांत पाणी प्रश्न…

रावेत, निगडी येथील पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा विस्कळीत झाल्यास शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. ही बाब महावितरण प्रशासनाने लक्षात घेतली पाहिजे. तसेच, अनेक भागात वीज पुरवठा अनियमित असल्यामुळे पाणी कमी दाबाने आणि अनियमित मिळते. त्यामुळे पाणी पुरवठ्याशी संबंधित वीज यंत्रणा सक्षम करण्याची आवश्यकता आहे. महावितरण आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत ठोस कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही आमदार लांडगे यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.