Maval : बाळा भेगडे व सुनील शेळके या दोघांची भिस्त निष्ठावंत कार्यकर्ते व नातेवाईकांवर

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची आज सांगता होत आहे. महायुतीचे उमेदवार बाळा भेगडे व महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून पायाला भिंगरी लावल्यासारखे मावळ तालुक्यातील सर्व गावांमध्ये जाऊन जनतेचे आशीर्वाद घेतले.  दोघांनाही प्रचारा दरम्यान चांगला प्रतिसाद मिळत आहे.  अनेक गावांमध्ये दोघांचे स्वागत करण्याकरिता एक सारखे चेहरे असल्याने तसेच मावळात निवडणुकी पार्श्वभुमीवर अनेक नाट्यमय राजकिय घडामोडी घडल्याने कोण कोणाला मतदान करणार याबाबत ठोस शाश्वती नसल्याने भाजपा, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष या महायुतीचे उमेदवार बाळा भेगडे व राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व स्वाभिमानी रिपाईचे उमेदवार सुनील शेळके या दोन्ही उमेदवारांची भिस्त निष्ठावान कार्यकर्ते व नातेवाईकांवर असल्याचे चित्र मतदारसंघात पहायला मिळत आहे.

बाळा भेगडे हे मागील दहा वर्षापासून मावळ तालुक्याचे आमदार व काही महिने राज्यमंत्री राहिल्याने त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणत मावळ तालुक्यात विकासकामे केली आहेत तर सुनील शेळके यांनी तीन ते चार वर्षापासून तालुक्याच्या विविध भागात नागरिकांना वैयक्तिक पातळीवर मदत तसेच गावांच्या विकासाला मदत केली आहे. दोन्ही उमेदवार हे विकासाची दृष्टी असलेले आहेत. प्रचारात देखील दोघेही विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जात असल्याने कोणाच्या पारड्यात मताचे दान टाकायचा हा प्रश्न आता मतदार राजासमोर उभा राहिला आहे.

बाळा भेगडे व सुनील शेळके हे दोघेही भाजपाकडून उमेदवारी करिता इच्छूक होते. भाजपातील काही पदाधिकारी हे भेगडे यांच्या मागे तर काही शेळके यांच्या मागे असे त्यावेळी चित्र होते. मात्र त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी घेतल्याने निष्ठावान भाजपाचे कार्यकर्ते शेळके यांचा हात सोडून पुन्हा भाजपात दाखल झाले. तर काही उघडपणे त्यांच्या सोबत आहेत. दुसरीकडे शेळके यांच्या उमेदवारीवर नाराज होत बाळासाहेब नेवाळे भाजपावासी झाले. त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला नसला तरी ते कार्यकर्ते कोणाशी एकनिष्ठ राहणार यावर निकालाचा कल राहणार आहे.

निवडणुकीच्या पूर्वी व आचारसंहिता काळात मावळात अनेक पक्षांतरे घडल्याने कोण कोणाला मतदान करणार, कोण कोणाचा माणूस समजुन येत नसल्याने उमेदवार देखील संभ्रमात आहेत. दिसायला मावळात सर्व काही आपल्याला अनुकूल आहे असे दोन्ही उमेदवारांना व पक्षांना वाटत असले तरी मावळात शेवटच्या क्षणाला नातीगोती महत्वाची भूमिका बजावतात हा इतिहास असल्याने मतदार संभ्रमावस्थेत आहेत.

भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात काही प्रमाणात खदखद आहे. बाळा भेगडे यांच्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा झाल्या तर सुनिल शेळके यांच्याकरिता राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व खासदार अमोल कोल्हे यांच्या सभा झाल्या. दोघांच्या सभांना होणारी गर्दी वाखण्याजोगी आहे. बाळा भेगडे निवडून आले तर त्यांना मंत्री करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी मावळवासीयांना दिले आहे तर शेळके निवडून आल्यास मावळ तालुक्याला काही कमी पडू देणार नाही असे आश्वासन पवार यांनी दिले आहे.

भाजपा कार्यकर्ते मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरिता व्यक्तीला नव्हे तर पक्षाला मतदान करा असे आवाहन करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्ष पाहू नका व्यक्तीला मतदान करा असे आवाहन करत आहेत. मावळातील भाजपाची 25 वर्षापासून असलेली सत्ता मोडीत काढण्याकरिता राष्ट्रवादीने कंबर कसली असून मावळ तालुक्याला कँबिनेट मंत्रीपद मिळवून देण्याचा इतिहास रचण्याकरिता भाजपाने रणनिती आखली आहे. महाराष्ट्रातील लक्षवेधी व प्रतिष्ठेची लढत मावळात होत असल्याने सर्वांच्या नजरा या लढतीकडे लागल्या आहेत.

दोन्ही उमेदवारांनी गावभेटींवर भर देत पायाला भिंगर्‍या बांधत मतदारांपर्यत पोहचण्याचा कसोशीने प्रयत्न केला असला तरी सुज्ञ मतदार हा मावळ तालुक्याच्या भविष्याला महत्व देत कोणाला मतदान करणार हे 24 ऑक्टोबरच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.