Swachh City : स्वच्छ भारत अभियानानंतर आता शहर आणि वॉर्ड सौंदर्यीकरण स्पर्धा

एमपीसी न्यूज –  स्वच्छ सर्वेक्षणानंतर (Swachh City) आता राज्य सरकारने शहरे स्वच्छ झाली तरच सुंदर दिसतील या उद्देशाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता आणि वॉर्ड स्तरावर वॉर्ड सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022 राबविण्यास सुरुवात केली आहे.

2 ऑक्‍टोबर ते  31 डिसेंबर 2022 या तीन महिन्यांच्या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ‘ब’ वर्गात असून या वर्गासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस तब्बल 15 कोटी, द्वितीय 10 कोटी आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस 5 कोटी रुपयांचे असणार आहे. वॉर्ड स्तरीय स्पर्धेकरिता महापालिकेने बक्षीस निश्चित करून स्वनिधीतून बक्षिसे प्रदान करावीत असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारच्या वतीने देशात 2016 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यास सुरूवात केली. पहिल्याच वर्षी शहराचा स्वच्छतेमध्ये नववा क्रमांक आला आणि शहर देशभर चर्चेत आले. 2017 मध्ये शहर थेट 72 व्या क्रमांकावर फेकले गेले. 2018 मध्ये यामध्ये थोडी सुधारणा होऊन 43 क्रमांक आला. 2019 मध्ये शहराची पुन्हा घसरण झाली आणि 52 क्रमांक आला. 2020 मध्ये सुधारणा होत 24 वा क्रमांक आला. 2021 मध्ये आणखी सुधारणा होत 19 वा क्रमांक आला. 2022 मध्येही 19 वा क्रमांक आला आहे.

आता राज्य सरकारने शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता आणि वॉर्ड (Swachh City) स्तरावर वॉर्ड सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा घेण्याची सूचना केली आहे. स्वच्छ भारत अभियानात सातत्य राखण्याच्या दृष्टीने व संपूर्ण नागरी भारत कचरा मुक्त करण्याच्या दृष्टीने वैयक्तिक, सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांच्या गुंतवणुकीमध्ये सातत्य राखणे, सांडपाण्याचा पुनर्वापर करणे, घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे व साठलेला कचरा, प्लास्टिक कचरा, बांधकाम व पाडकाम कचरा इत्यादीची विल्हेवाट लावणे, आर्थिक मदत करणे इत्यादी गरजा विचारात घेऊन केंद्र शासनाच्या धोरणानुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2 बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

शहर सौंदर्यीकरणाबरोबरच स्वच्छतेचे महत्त्व आहे. स्वच्छतेशिवाय शहराचे सौंदर्यीकरण अशक्‍य आहे. अशा योजना राबविल्यांमुळे शहरांचा चेहरा-मोहरा बदलत आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या स्पर्धा घेण्याचा उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. या स्पर्धेत सहभाग घेणे महापालिकेला बंधनकारक आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची जानेवारी 2023 मध्ये या स्पर्धेची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्यात येईल. या स्पर्धेत यश मिळाल्यास महापालिकेला कोट्यावधी रूपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या योजनेसाठी होणारा खर्च स्व-निधी, सीएसआर निधी व लोकसहभागातून करण्यात यावा, अशा सूचना राज्य सरकारने महापालिकेला केल्या आहेत. जानेवारी महिन्यात स्पर्धेची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्यात येणार आहे.

अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले, “शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता (Swachh City) आणि वॉर्ड स्तरावर वॉर्ड सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेच्या निकषानुसार घरोघरचा ओला-सुका कचरा वर्गीकरण, ऑन साईड वेस्ट कंपोस्टींग याला प्राधान्य असणार आहे. त्याचबरोबर सौंदर्यीकरणात शहरातील रस्ते, उड्डाणपूल, चौक, पादचारी पूल यांचा समावेश आहे. यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांमार्फत पुढील 90 दिवसांत कार्यवाही करण्यात येईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.