PMC Waste project news : विनानिविदा कचरा प्रक्रिया दराचा प्रस्ताव रद्द करून दोषींवर कारवाई करा

स्वयंसेवी संस्थाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

एमपीसी न्यूज : रामवाडी प्रकल्पात शहरातील सुमारे 40 हजार मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याचे 9 कोटी रुपयांचे काम ठेकेदारांना विनानिविदा देण्याचा ‘अतितातडीचा विषय’ सांगत हा प्रस्ताव स्थायीने मंजुर केला. हा प्रस्ताव रद्द करून संबंधितांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विविध स्वयंसेवी संस्थानी केली आहे.

महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 900 रुपये प्रति टन प्रक्रिया खर्च करुन रामवाडी येथील 40 हजार मेट्रीक टन कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. महापालिकेत ठराविक कालावधीनंतर असे प्रस्ताव येत असतात आणि ते ‘सर्वानुमते’ मंजूर होत असतात. कचरा, पाणी यासारख्या प्रश्नांवर तातडी निर्माण करायची आणि नंतर ‘अतितातडीचा विषय’ म्हणून नियम व अटी डावलून ते मंजूर करायचे ही पुणे पालिकेतील जुनी प्रथा आहे. पुण्याच्या कारभाऱ्यांनाही असे विषय मंजूर करताना कोणतेही प्रश्न पडत नाहीत.

या मंजूर प्रस्तावात मांडलेले अनेक मुद्दे आक्षेपार्ह आहेत. पुणे शहराची सध्याची लोकसंख्या 44 लाख असून पुण्यात दिवसाला 2000 ते 2100 मेट्रिक टन म्हणजे सर्वसाधारणपणे 21 लाख किलो म्हणजेच प्रतिदिन प्रतीव्यक्ती 2.5 किलो कचरा निर्माण होतो, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी  स्थायी समिती समोर ठेवलेल्या प्रस्तावात नमूद केले आहे.

हे प्रमाण या सरासरीच्या तिपटीपेक्षा जास्त आहे. म्हणजे पुण्यात सरासरीपेक्षा प्रतिदिन प्रतीव्यक्ती 1375 ग्रॅम जास्त कचरा निर्माण होतो, असं प्रशासनाचं म्हणणे आहे. ही आकडेवारी खरी असेल तर प्रशासनाने त्याची कारणं आणि त्यावर उपाय काय आहेत हे सुचवणं गरजेचे होतं. मात्र तसं न करता ढोबळ आकडेवारी समोर ठेवून ठेकेदारांना विनानिविदा काम देण्यासाठीचा हा प्रस्ताव गुपचूप मंजूर केला आहे.

त्यामुळे या प्रकरणी लक्ष घालून हा प्रस्ताव रद्द करून या कामाची चौकशी करावी, अशी मागणी अध्यक्ष सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार, नागरिक चेतना मंचचे मेजर जन(रिटा) एस. सी. एन.जटार,  सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.