Chakan : चाकण हिंसाचारातील दोषींवर कारवाई करा; निर्दोष युवकांना त्रास होऊ नये

शिवसेनेची मागणी 

एमपीसी न्यूज – चाकण हिंसाचारातील खऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी, दंगा करण्यासाठी बाहेरून आलेल्या मंडळींचा शोध घ्यावा. मात्र, प्रत्यक्षात ज्या स्थानिक युवकांचा हिंसाचारात सहभाग नव्हता त्यांना त्रास होऊ देऊ नये, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने चाकण पोलिसांकडे करण्यात आली आहे.

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे यांनी चाकण पोलिसांची भेट घेऊन याबाबतची माहिती घेतली. यावेळी माजी जि.प. सदस्य किरण मांजरे, नगराध्यक्ष शेखर घोगरे, प्रकाश वाडेकर, समीर सिकीलकर, किरण गवारे, लक्ष्मण जाधव, अशपाक शेख, पांडुरंग गोरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संखेने सहभागी होते.

खासदार आढळराव यांनी हिंसाचारात सहभागी असलेल्या पिंपरी-चिंचवड लगतच्या काही भागातील युवकांची नावे समोर येत असून याबाबत खातरजमा करून घेण्याची मागणी पोलिसांकडे केली. चौकशी दरम्यान निर्दोष युवकांना त्रास होऊ नये, अशा सूचना पोलिसांना दिल्या. आमदार गोरे यांनी चाकण परिसरातील युवकांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची खात्री झाल्याशिवाय ताब्यात घेऊ नये अशा सूचना केल्या. मात्र, या हिंसाचारात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्वांवर रीतसर कारवाई करावी, कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नये, अशा सूचना केल्या.

यावेळी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी सांगितले की संशयित असलेल्या मंडळींना चौकशीसाठी ताब्यात घेतले तरी त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याशिवाय कारवाई करणार नाही. कुणावरही आकसाने कारवाई होणार नाही. हिंसाचारात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्वांवर रीतसर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.