Talegaon Crime News : द्रुतगती मार्गावर ट्रक चालकांना लुटणारी टोळी गजाआड

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ट्रक चालकांना लुटणारी टोळी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचने पकडली. टोळीकडून सहा मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण तीन लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिलीप गंगाराम जाधव (वय 24, सांगडेवाडी, ता. खालापूर, जि. रायगड), मंगेश भाऊ पवार (वय 22, निंबोडे, ता. खालापूर, जि. रायगड), रविंद्र युवराज धारपवार (वय 30, विणेगाव, ता. खालापूर, जि. रायगड), गणेश नारायन चौधरी (वय 36, रा. तुकसई, ता. खालापूर, जि. रायगड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 ऑगस्ट रोजी पहाटे उर्से टोलनाक्याजवळ रस्त्याच्या कडेला ट्रक थांबवून झोपलेल्या ट्रक चालकाला अज्ञातांनी मारहाण करुन लुटले. याबाबत तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्हाचा गुन्हे शाखा युनिट पाचने समांतर तपास केला.

पोलीस हवालदार दत्तात्रय बनसुडे यांना माहिती मिळाली की, या प्रकरणातील आरोपी खोपोली न खालापूर परीसरातील आहेत. त्यानुसार पोलिसांनी दोन पथके तयार करून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उर्से टोल नाक्याजवळ गुन्हा केल्याचे कबूल केले.

आरोपींकडून सहा मोबाईल फोन, गुन्ह्यासाठी वापरलेली इको कार असा एकूण तीन लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी मंगेश पवार हा कामशेत, खोपोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या तर खालापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात फरार होता. याव्यतिरिक्त त्याच्या विरोधात कामशेत, खोपोली आणि खालापूर पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत. आरोपी रवींद्र धारपवार याच्या विरोधात खोपोली आणि खालापूर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.