एमपीसी न्यूज –  बोरिवली येथून श्रीगोंदा येथे रुग्णाला घरी सोडविण्यासाठी घेऊन जात असताना टोलनाक्यावर वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका अडवली. एका पोलिसाने चालकाच्या वडिलांना काठीने मारहाण केली. यामध्ये मारहाण झालेल्या व्यक्तीचा काही अंतर पुढे गेल्यानंतर मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 27) दुपारी एकच्या सुमारास उर्से टोलनाक्यावर घडली. या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

नरेश शिंदे (वय 49, रा. ठाणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत नरेश यांचा मुलगा निलेश शिंदे यांची रुग्णवाहिका ठाणे सिव्हिल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. ते गुरुवारी रात्री एका रुग्णाला घेऊन बोरिवली येथून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे निघाले होते. प्रवासाचे अंतर जास्त असल्याने निलेश यांनी त्यांचे वडील नरेश यांना सोबत घेतले. सुरुवातीला मुंबईपासून पुण्यापर्यंत नरेश यांनी रुग्णवाहिका चालवली. त्यानंतर त्यांना झोप लागत असल्याने रुग्णवाहिका चालविण्यासाठी निलेश याच्याकडे देऊन ते झोपी गेले.

दुपारी एकच्या सुमारास त्यांची रुग्णवाहिका मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाक्यावर आली. तिथे थांबलेल्या वाहतूक पोलिसांनी निलेश यांना खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर एका वाहतूक पोलिसाने नरेश यांच्या पाठीत जोरात काठी मारली. तर दुस-या वाहतूक पोलिसाने नरेश यांना तुम्ही सीट घेऊन जात असल्याचे म्हणत एका अधिका-याकडे नेऊन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच तडजोड म्हणून पाच हजार रुपयांची मागणी केली. मात्र नरेश यांच्याकडे पाच हजार रुपये नसल्याने रुग्णवाहिकेत रुग्ण आणि त्याचे नातेवाईक असल्याने त्यांनी तीन हजार रुपये देऊन प्रकरण मिटवले.

दरम्यान, नरेश यांनी त्यांची रुग्णवाहिका साधी असून कार्डियाक रुग्णवाहिका नाही. त्यामुळे या रुग्णवाहिकेत सोबत डॉक्टर नसतात, असे पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी त्यांना सीट वाहून नेत असल्याचे म्हणत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असल्याचे निलेश यांनी सांगितले.

त्यानंतर निलेश रुग्णवाहिका घेऊन चाकणच्या दिशेने गेले. चाकणच्या पुढे गेल्यानंतर नरेश यांनी जीभ बाहेर काढून मान टाकली. वडिलांना त्रास होत असल्याने निलेश यांनी शिक्रापूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

हा प्रकार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अति वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानी गेला. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची चौकशी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत करीत आहेत.

पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत म्हणाले, “या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक अहवालात नरेश यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांचा सविस्तर अहवाल येणे बाकी आहे. त्यांनतर पुढील कारवाई केली जाईल.”