Talegaon Dabhade News : नगराध्यक्ष पदाची खुर्ची बसण्यासाठी नव्हे काम करण्यासाठी आहे – माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे

एमपीसी न्यूज – दिव्यांगांसाठी राखीव निधीची तरतूद केलेली असते. त्यातून दिव्यांगांना त्यांच्या योजनेसाठी निधी वितरित करायचा असतो. नगराध्यक्षांनी ही कामे करायची असतात. या बाबी नगराध्यक्षांना माहिती असायला हव्यात. सणासुदीच्या दोन तीन दिवस अगोदर दिव्यांगांना अनुदान मिळायला हवे. नगराध्यक्ष पदाची खुर्ची बसण्यासाठी नव्हे तर काम करण्यासाठी आहे, असा टोला माजी नगराध्यक्षा विद्यमान नगरसेविका सुलोचना आवारे यांनी लगावला.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे जून, जुलै व ऑगस्ट 2021 या महिन्यांचे अनुदान रखडले होते. दिव्यांगाचे अनुदान त्वरित देण्याच्या मागणीसाठी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि.8) सकाळी 11 वा. ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी विरोधी पक्षनेते गणेश काकडे, जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, नगरसेवक निखिल भगत, रोहित लांघे, समीर खांडगे, माजी नगरसेवक सुनील कारंडे, समाज कल्याण विभाग प्रमुख सुवर्णा काळे, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष किशोर दिघे, उपाध्यक्ष किशोर कुलकर्णी, सचिव पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी युवक तळेगाव अध्यक्ष आशिष खांडगे, कल्पेश भगत, दिव्यांग संघटनेचे व जनसेवा विकास समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सुलोचना आवारे म्हणाल्या, “दिव्यांगांचे अनुदान देण्याबाबत, त्यांच्या इतर समस्यांबाबत नगराध्यक्षांना माहिती असायला हवे. नगराध्यक्षांनी ही कामे करायची असतात. सणासुदीच्या दोन तीन दिवस या दिव्यांगाना अनुदान मिळायला हवे. माझ्या काळात सणासुदीच्या दिवसात दोन दिवस अगोदरच अनुदान वाटप केले जात होते. आम्हा नगरसेवक, नगराध्यक्षापेक्षा जनता ही मोठी आहे. आम्हाला खुर्ची बसण्यासाठी नाही, काम करण्यासाठी दिली आहे. सत्ताधाऱ्यांनी कामे करायला हवी.”

ठिय्या आंदोलनामुळे नगरपरिषदेने जून व जुलै या दोन महिन्यांचे अनुदान 338 दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी तीन हजार रुपयांप्रमाणे एकूण 20 लाख 28 हजार रुपये वर्ग केले.

यावेळी दिव्यांगाला व्यवसायासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे नगरपरिषदेचे व्यावसायिक गाळे व प्रवासासाठी बस पास देण्याची मागणी केली.

किशोर आवारे म्हणाले साडेतीन कोटींची बिले काढण्यासाठी नगरपरिषदेकडे पैसे आहेत, मात्र दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठी पैसे नाही अशी खंत व्यक्त करुन दिव्यांगाला दोन महिन्याचे अनुदान दिल्याने समाधान व्यक्त केले.”

विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी जनसेवा विकास समितीने दिव्यांगांसाठी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. काकडे म्हणाले साडेतीन कोटीची बिले निघतात, दिव्यांगांच्या अनुदानाचे बील निघत नाही, ही तळेगाव नगरपरिषदेच्या दृष्टिने किती लाजिरवाणी गोष्ट आहे. नगराध्यक्षांनी याचे आत्मपरीक्षण करावे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते कल्पेश भगत यांनी केले. सूत्रसंचालन व स्वागत जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी केले. तर नगरसेवक निखिल भगत यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.