Talegaon Dabhade : सोमाटणे टोलनाका हटविण्याच्या मागणीसाठी हजारोंचा जनआक्रोश मोर्चा

एमपीसी न्यूज – सोमाटणे येथील टोलनाका हटविण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने शनिवारी (दि.16) जन आक्रोश आंदोलन केले. हा टोलनाका बेकायदेशीर असून तो हटविण्यात यावा, अशी मागणी सर्वपक्षीय टोल हटाव कृती समितीने यावेळी केली. कोल्हापूर येथील टोलनाका स्थानिकांच्या मागणीमुळे बंद झाला. त्याच धर्तीवर हा टोलनाका देखील बंद व्हावा, असा आग्रह आंदोलकांनी धरला.

मावळवासीयांकडून आयआरबी बेकायदा टोल वसूल करून आर्थिक लूट करत आहे. स्थानिक आंदोलनामुळे कोल्हापूरचा टोल नाका बंद झाला. त्याच धर्तीवर मावळात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सोमाटणे टोल हटाविण्यासाठी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या पुढाकाराने जन आंदोलन उभारण्यात आले.

टोल बंद करण्यासाठी मी जनतेसोबत आहे. हा टोल बंद करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. मावळवासीयांना टोलसूटसाठी आंदोलन झाले पण आता हा टोल हटविण्यासाठीच तीव्र आंदोलन होणार. मावळवासीयांनी टोल भरू नये. वादाचे प्रकार घडले तर टोल प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला. सर्वपक्षीय टोल हटाव कृती समितीच्या वतीने सोमाटणे टोल नाका हटविणेबाबत शनिवारी जन आक्रोश मोर्चाच्या प्रसंगी ते बोलत होते.

लिंबफाटा ते सोमाटणे टोलनाका पर्यंत भर उन्हात हा मोर्चा काढण्यात आला. हजारोच्या संख्येने सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक त्यात सहभागी झाले होते.

कडक उन असूनही मोर्चास प्रचंड प्रतिसाद मिळाला. महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती. सकाळी 11 वाजता लिंब फाटा येथे सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित झाले. जन आक्रोश मोर्चाचे नेतृत्व जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी केले.

जनआक्रोश मोर्चाची सुरुवात शिववंदना घेऊन झाली. मोर्चाच्या वेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त आनंद भोईटे, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, रणजित सावंत, सत्यवान माने, अधिकारी दुर्गनाथ साळी, महेश मतकर, तसेच राज्य राखीव पोलीस बल यांचा सशस्त्र बंदोबस्त ठेवण्यात आला.

पोलिसांनी टोल नाक्याच्या आधी अर्धा किलोमीटर अंतरावर मोर्चाला रोखले. त्या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. जन आक्रोश मोर्चा सकाळी साडेअकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरु होता. जुना मुंबई-पुणे महामार्ग एक तास बंद असल्याने दुतर्फा 5 ते 6 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलन संपल्यावर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. या आंदोलनाची मावळ तालुक्यात चर्चा रंगली होती.

सर्वपक्षीय टोल हटाव कृती समितीच्या वतीने प्रशासनाला 10 मे पर्यंत मुदत देण्यात आली असून त्यानंतर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला. आयआरबीच्या अधिकारी, तसेच एमएसआरडीसीचे अभियंता राकेश सोनवणे तसेच पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा झाली पण चर्चा निष्फळ ठरली.

याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले की, मावळच्या जनतेची लूट केली जात आहे. राज्य सरकारने जनतेची लूट थांबवावी. जनता टोल नाका बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरली असून सहनशीलतेचा अंत पाहू नका. टोल नाका हटवायला वेळ लागणार नाही. जनतेच्या प्रतिनिधीने जनतेची लूट थांबवावी.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे म्हणाले की, हा टोल नाका बेकायदेशीर असून सर्व कागदपत्रे माहिती अधिकारातून मिळविली आहेत. जनतेची दिशाभूल केली जात आहे. टोल आंदोलन थांबविण्यासाठी अनेक प्रलोभने दिली. जनतेची उघड्या डोळ्यांनी लूट होत आहे त्यामुळे हा टोल बंद झाल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही.

भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे  म्हणाले की, हे आंदोलन जनतेचे आहे. राजकीय पक्ष बाजूला ठेवून जनतेच्या प्रश्नांसाठी पुढाकार घ्यावा. हा टोल बंद झालाच पाहिजे.

नगरसेवक गणेश खांडगे, भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यादवेंद्र खळदे, मनसे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, संतोष कदम, गणेश काकडे आदींनी मनोगत व्यक्त केले.

आयआरबी बेकायदा वसुली करीत आहे यापुढे मावळवासीयांनी टोल भरु नये. येत्या 10 मे पर्यंत सोमाटणे टोल नाका बंद झाला नाहीतर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे सर्वपक्षीय टोल हटाव कृती समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेवक किशोर भेगडे, माजी नगराध्यक्ष सुलोचना आवारे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, अमोल शेटे, रोहित लांघे, सुनील मोरे, सचिन भांडवलकर, मिलिंद अच्युत, जमीर नालबंद, रवींद्र माने तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

मोर्चाच्या प्रसंगी प्रास्ताविक व सूत्रसंचालन संतोष दाभाडे यांनी केले. आभार नगरसेवक गणेश काकडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.