Talegaon : डॉ. बाबासाहेबांना तळेगावच्या बंगल्यावर आनंदाने जेवू घालणाऱ्या काशीबाई गायकवाड यांचे निधन

एमपीसी न्यूज – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक वेळेला आनंदाने जेवण बनवून खाऊ घालणाऱ्या काशीबाई दत्तात्रय गायकवाड (वय 96) यांचे वृद्धापकाळाने रविवारी (दि. 14) निधन (Talegaon) झाले. बाबासाहेबांच्या तळेगाव सोबतच्या अनेक आठवणी यानिमित्ताने पुन्हा समोर आल्या आहेत.

काशीबाई गायकवाड यांचा विवाह मावळ तालुक्यातील धामणे येथील दत्तात्रय गायकवाड यांच्याशी झाला. गायकवाड घराणे सधन संपन्न होते. दत्तात्रय गायकवाड यांचे वडील लिंबाजी अमृतराव गायकवाड हे मोठे कंत्राटदार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची मुंबई येथे स्थापना केली. पुढे औरंगाबाद इथे देखील या सोसायटीची एक संस्था सुरु झाली. शहरी भागानंतर ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी करणे आवश्यक असल्याचे डॉ. बाबासाहेबांना वाटले.

दरम्यान, लिंबाजी गायकवाड हे (Talegaon) मावळ आणि परिसरातील जंगल विकत घेत. त्यातील जीर्ण वृक्ष तोडून ते कातकर बांधवांकडून जाळून त्याचा कोळसा तयार करत आणि हा कोळसा मुंबईला पाठवत. ज्वारीची ताटे गोळा करून तीही मुंबईला पाठवण्याचे काम ते करत.

Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ग्रामीण भागात शैक्षणिक संस्था काढण्याचा विचार आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिंबाजी गायकवाड यांना भेटण्यासाठी सांगावा धाडला. लोणावळा येथे ही भेट ठरली. लोणावळा येथे झालेल्या भेटीत बाबासाहेबांनी लिंबाजी गायकवाड यांना चांगली जागा शोधून तिथून आपले कार्य सुरु ठेवण्यासाठी मदतीचे आवाहन केले. त्यानुसार लिंबाजी गायकवाड यांनी तळेगाव दाभाडे येथे हर्नेश्वर टेकडीच्या दक्षिणेला एक मोक्याची चांगली जागा मोठ्या कष्टाने शोधली. तिथे बंगला बांधला. दोन विहिरी पाडल्या. सन 1948 साली तळेगाव मधील बाबासाहेबांचा बंगला तयार झाला.

बाबासाहेब जेव्हा जेव्हा मुंबईहून पुणे, सोलापूर या भागात जात तेव्हा तेव्हा ते तळेगावच्या बंगल्यावर येत असत. लिंबाजी गायकवाड यांच्या स्नुषा असलेल्या काशीबाई बाबासाहेबांच्या तळेगाव येथील बंगल्यावर असत. बाबासाहेब येण्याच्या आदल्या दिवशी कचेरीतून एक अंमलदार बंगल्यावर येई. तो काशीबाईंना बाबासाहेब येणार असल्याचे सांगत असे. त्यानंतर त्यासोबत बाबासाहेबांनी दिलेली एखादी विशेष सूचना देखील तो काशीबाई यांच्यापर्यंत पोहोचवत असे.

काशीबाई यांच्या हातची बोंबलाची चटणी बाबासाहेबांना आवडत असे. काशीबाई अगदी सुगरण गृहिणी होत्या. जात्यावर दळून हातावर थापलेली आणि चुलीवर भाजलेली खरपूस बाजरीची भाकरी बाबासाहेब आवडीने खात. त्यासोबत मेथीची भाजी, मूग डाळीचे वरण, शेंगदाणा चटणी, जवस चटणी, तिळाची चटणी ते मागून मागून खात असत.

बाबासाहेब येणार असे समजल्यानंतर काशीबाई आनंदाने सगळा स्वयंपाक करत. बाबासाहेबांना स्वच्छतेची फार आवड असल्याने त्यांची भांडी अगदी चकचकीत करून ठेवत. बाबासाहेब तांब्याच्या भांड्यात जेवण करत, त्यामुळे त्या भांड्यांच्या स्वच्छतेची त्यापुरती काळजी घेत असत. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत काशीबाई यांनी दादासाहेब गायकवाड, आचार्य अत्रे, बॅरिस्टर खोब्रागडे, आर आर भोळे यांनाही त्यांनी तितक्याच मायेने जेवू घातले होते.

आपल्या हयातीत बाबासाहेब तळेगावच्या बंगल्यावर 48 वेळा आले होते. आईच्या जाण्याने आता त्या सर्व आठवणी स्मरणात आहेत, असे काशीबाई यांचे मुलगा बृहस्पती यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना सांगितले.

काशीबाई यांचा जन्म 7 एप्रिल 1929 रोजी झाला. नुकताच त्यांचा 95 वा वाढदिवस साजरा झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी (14 एप्रिल) पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.