Talegaon : ‘ती’ थप्पड निमित्तमात्र; आवारे हत्येमागे होती भलीमोठी खदखद

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात (Talegaon) सर्वांसमोर कानशिलात मारल्याच्या रागातून किशोर आवारे यांची हत्या झाल्याचे आता सर्वश्रुत झाले आहे. त्यातील मास्टरमाईंड भानू खळदे याच्यासह आठ जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र केवळ कानशिलात लगावल्याने एवढ्या टोकाचे पाऊल उचलले, असे असले तरी यामागे अनेक दिवसांपासूनची विविध कारणांची खदखद होती, अशी चर्चा मावळ परिसरात सुरु आहे.

जनसेवा विकास समितीची स्थापना किशोर आवारे आणि भानू खळदे यांनी एकत्रितपणे केली. नव्या दमाचा नवा पक्ष तळेगावच्या राजकारणात उतरला. नगरपरिषद निवडणूक देखील जनसेवा विकास समितीने लढवली. त्यानंतर अनेक कारणांवरून आवारे आणि खळदे यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली.

तळेगाव दाभाडे येथे भानू खळदे याची एक बांधकाम साईट सुरु होती. ती साईट खळदे एका भागीदारासोबत जॉईंट व्हेंचरमध्ये विकसित करीत होता.

त्या बांधकाम साईटकडे जाणाऱ्या मार्गावर काही झाडे आडवी येत असल्याने ती झाडे काढण्याची परवानगी खळदे यांनी नगरपरिषदेकडे मागितली. नगरपरिषदेने परवानगी दिल्यानंतर मार्गावरील झाडे तोडण्यात आली. ही झाडे बेकायदेशीरपणे तोडली असल्याचा संशय आवारे यांना होता.

त्याबाबत त्यांनी थेट नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी तक्रार देखील केली. त्या अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी दोघांना बोलावले. त्यावेळी आवारे आणि खळदे यांच्यात खडाजंगी झाली. मुख्याधिकारी कार्यालयासमोर आवारे यांनी खळदे यांना कानशिलात लगावली.

Maharashhtra News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन विभागाची जबाबदारी

चार चौघांमध्ये आपल्याला मारहाण झाली. त्यामुळे आपली इभ्रत गेली. गेल्या 20 ते 25 वर्षापासून राजकीय क्षेत्रात खळदे कुटुंबांचे चांगले नावलौकिक आहे. अश्या गोष्टीमुळे आपल्या कारकिर्दीला तडा गेल्याची भावना खळदेच्या मनात निर्माण झाली.

तसेच या वादामुळे संबंधित बांधकाम प्रकल्पाचं काम रखडलं. त्याचा खळदे (Talegaon) याला आर्थिक तोटा सहन करावा लागला. याचाच बदला घेण्यासाठी म्हणून हा पुढचा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

याच वादाचा पुढील अंक म्हणजे ‘सोमाटणे टोलनाका’. मावळात चर्चा सुरु आहे की, सोमाटणे टोलनाका येथील सुरक्षा आणि मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट खळदे याच्याकडे आहे. दरम्यान, सोमाटणे टोलनाका बेकायदेशीर असून तो बंद करण्याची मागणी करत आवारे यांनी मोठे जनआंदोलन उभारले.

टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून उपोषण देखील केले. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मध्यस्थी करून याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आणि उपोषण मागे घेण्यात आले. टोलनाका बंद झाल्यास त्याचा आर्थिक फटका खळदे याला बसणार होता.

तळेगाव स्टेशन येथे गौरव खळदे यांनी उभारलेल्या अत्याधुनिक खाऊ गल्लीवरून देखील दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. तो व्यवसाय बंद करण्याचा प्रयत्न आवारे यांच्याकडून झाल्याचा संशय खळदे परिवाराच्या मनात होता, असं बोललं जातं

आवारे हत्या प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीच्या जमिनीवर आवारे यांनी ताबा मारला असल्याचा आरोप देखील केला जात आहे. त्यामुळे आवारे यांच्याबद्दलचा द्वेष वाढीस लागला.

वरील सर्व घटनांमधील द्वेषाचे बदल्याच्या भावनेत रुपांतर झाले आणि त्यातूनच आवारे यांची 12 मे रोजी हत्या झाली असल्याची देखील चर्चा सुरु आहे. बदल्याची भावना अक्षम्य गुन्ह्यात परावर्तीत झाली.

पोलिस प्रशासनाने अवघ्या 24 तासात घटनेतील आरोपी पकडले व पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. यावेळी पोलीस प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न करून मुख्य सूत्रधार सुद्धा पकडला. कायदेशीर कारवाईमधून आरोपींना योग्य ते शासन होईल, मात्र सूडाच्या प्रवास असाच चालू राहिला तर राजकीय व सामाजिक समीकरणे वेगळ्या पद्धतीने बदलताना दिसतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.