Talegaon News : लोकवस्ती नसतानाही तळेगाव – कातवी रस्त्यावर कचऱ्याचा ढीग

एमपीसी न्यूज – तळेगाव – कातवी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असून जवळपास रहिवासी वस्ती नसताना हा कचरा येतो कुठून व हा कचरा उचलायचा कोणी असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे या कचऱ्याला वाली कोण? असा सवाल नागरिक करत आहेत.

तळेगाव नगरपरिषद हद्दीतील यशवंतनगर व वडगाव नगरपंचायत हद्दीतील कातवी गाव या भागाला जोडणाऱ्या तळेगाव कातवी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कचरा डेपो तयार झाला आहे. तळेगाव हद्दीतील यशवंतनगर व वडगाव हद्दीतील कातवी हे दोन्ही रहिवासी भाग या कचरा डेपो पासून लांब आहेत व दोन्ही ठिकाणी कचरागाड्यांची व्यवस्था आहे.

त्यामुळे जवळपास रहिवाशी भाग नसताना संबंधित ठिकाणी कचरा येतो कुठून हा संशोधनाचा विषय बनला आहे तर तो कचरा तळेगाव नगरपरिषदेने की वडगाव नगरपंचायतने उचलायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही शहरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात असताना वेशीवर मात्र कचऱ्याचे ढीग साचत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

हा कचरा कुजल्याने तीव्र दुर्गंधीयुक्त वास येत असून या कचऱ्यावर मोकाट जनावरे व कुत्र्यांचा खाण्यासाठी वावर वाढत आहे. या मार्गावरून तळेगाव दाभाडे – नवलाख उंब्रे एमआयडीसी क्षेत्रात जाणारे कामगार, आंबी, मंगरूळ, गोळेवाडी, आंबळे, कदमवाडी, निगडे व कल्हाट आदि गावातील ग्रामस्थांची वर्दळ असते.

तसेच, परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून कचरा त्वरित उचलून परिसर स्वच्छ करण्यासह कचरा फेकणाऱ्यांवर पथक नेमून कडक कारवाई करण्याची मागणी मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पै शांतनु घुले, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्रीधर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अरूण चव्हाण, संतोष पिंपळे आदींनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.