Talegaon News : तळेगावात गुरुवारी रॅपिड अँटीजेन टेस्ट; एक दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन

प्रांताधिकारी संदेश शिर्के यांची माहिती

एमपीसीन्यूज : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या शासनाच्या मोहिमेंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत गुरुवारी (दि.24) नागरिकांची कोरोना रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी एक दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती मावळ – मुळशीचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी दिली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृहामध्ये आज (दि.22) झालेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, तळेगावच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मुख्याधिकारी रवी पवार, वैद्यकीय अधिकारी गुनेश बागडे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे आदींसह नगरपरिषदेतील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये अँटीजेन टेस्ट बाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. संपूर्ण तळेगावातील 13 प्रभागांमध्ये पूर्ण नियोजन झाले असून तळेगावातील चार ठिकाणी तपासणी केंद्र उभारण्यात येणार आहे. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक प्रभागांमध्ये दोन लॅब टेक्निशन, वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवक यांची नेमणूक केली आहे.

तपासणी करणा-या स्वयंसेवकास नागरिकांमध्ये कोरोना विषाणू असल्याची लक्षणे आढळल्यास त्याची तपासणी गाव भागामध्ये कन्या शाळा, नगरपरिषद क्रीडा संकुल, तर स्टेशन भागामध्ये नवीन समर्थ विद्यालय, संत ज्ञानेश्वर शाळा याठिकाणी सदर लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांची अँटीजेन टेस्ट होणार आहे.

ज्या शासकीय कर्मचा-यावर या अँटीजेन टेस्ट सर्व्हे मध्ये कामाची जबाबदारी सोपवलेली आहे त्यांनी काम चुकारपणा केला, तर त्यांची गय केली जाणार नाही. असा इशारा तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी यावेळी दिला.

सर्व नागरिकांनी या अँटीजेन टेस्ट सर्व्हेसाठी व एक दिवसाच्या लॉकडाऊनला सहकार्य करावे. तसेच या एक दिवसाच्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये दूध, औषध दुकाने, दवाखाने चालू राहतील, असे मावळ मुळशीचे प्रांत संदेश शिर्के यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.