Talegaon News : … तरीही मुख्याधिकारी म्हणतात, ‘ऑल इज वेल!’

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरवासीयांकरिता शुद्ध आणि पुरेसे नियमित पाणी, स्वच्छ व सुंदर तळेगाव शहर, (Talegaon News ) चांगले रस्ते, आकर्षक स्ट्रीट लाईट, सुंदर उद्याने आणि बागा, तसेच नागरिकांना लागणाऱ्या गरजेच्या नागरी सुविधा भविष्यात पुरविण्याची ग्वाही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांनी तातडीने बोलविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

गुरूवारी (दि 5) सकाळी मुख्याधिकारी एन के पाटील यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली होती. सध्या नगरपरिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा पुरता बोजवारा उडालेला असून नागरिकांना गरजेच्या नागरी सुविधा पुरविण्यास नगरपरिषद असमर्थ ठरत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकाऱ्यांनी ‘ऑल इज वेल’चा आव आणत तळेगावकरांचे स्वप्नरंजन केले.

तळेगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याने सर्वाधिक नागरिक संतप्त झालेले असून नागरिकांना पाणी कधी येईल याची खात्रीच वाटत नाही. पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांनी पाणी पुरवठा विभागाकडे विचारणा केल्यावर अधिकारी उत्तरे न देता टोलवाटोलवी करीत असतात तर काही वेळा नागरिकांना उद्धटपणे आणि आरेरावीची भाषा वापरली जाते.

Wakad : शासकीय वसतीगृहाच्या छताचा भाग कोसळून विद्यार्थिनी जखमी

त्यामुळे शहरातील सर्वच विभागातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत तर काही नागरिकांनी या तक्रारी लोकप्रतिनिधीच्या (Talegaon News ) कानावर घातलेल्या आहेत. तर काही लोकप्रतिनिधींनी मुख्याधिकारी एन के पाटील यांची हकालपट्टी करण्याची मागणीही केली आहे.

नगरपरिषदेच्या बट्ट्याबोळ झालेल्या नागरी सेवा

1) अपुरा व अनियमित पाणीपुरवठा
2) शहरात अस्ताव्यस्त कार्याचे साम्राज्य
3) शहर स्वच्छतेकडे दुर्लक्ष
4) अनियमित औषधे फवारणी
5) खड्डेमय रस्ते

शहरातील स्वच्छतेच्या तीन-तेरा वाजले असून अतिशय रामभरोसे ही सेवा पुरविली जात आहे. शहरातील डेंग्यू, मलेरिया यावरील फवारणी कधीच वेळेवर होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असताना आरोग्य विभाग मात्र सुस्तपणे वागत आहे.

भुयारी गटार योजनेसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची डांबरीकरणाची कामे अर्धवट तर काही रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून शहर अभियंता मात्र ठेकेदाराचे लांगुलचालन करण्यात व्यस्त असतात, अशा अनेक नागरी प्रश्नांवर पत्रकारांनी मुख्याधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाच्या निष्काळजीपणामुळे शहरातील विविध भागातील रस्त्यावर अतिक्रमणे वाढत आहेत. तर मुख्याधिकारी यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांना दिलेले कामाचे लेखी आदेश झुगारले जात असल्याचे पत्रकारांनी मुख्याधिकारी श्री पाटील यांचे लक्षात आणून दिले.

या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी मुख्याधिकाऱ्यांवर नागरी प्रश्नांबाबत प्रश्नांची चांगलीच सरबत्ती केली तर त्यांनी काही प्रश्नांबाबत सारवा- सारवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.