Tathawade : सिलेंडर स्फोट प्रकरण शेकले; दोन अधिकाऱ्यांसह सहा पोलीस निलंबित

एमपीसी न्यूज – ताथवडे (Tathawade) येथे रविवारी (दि. 8) रात्री बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करत असताना मोठा स्फोट झाला. हे प्रकरण सहा पोलिसांवर शेकले आहे. दोन अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.

सहायक पोलीस निरीक्षक परवेझ शिकलगार, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी ठाकूर आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सोमवारी रात्री उशिरा देण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी रात्री ताथवडे (Tathawade) येथील जेएसपीएम संस्थेच्या ब्लॉसम इंग्लिश स्कूल जवळ मोकळ्या मैदानात प्रोपीलीन गॅस भरलेल्या कॅप्सूल (टँकर) मधून बेकायदेशीरपणे गॅस चोरी करत असताना आगीची दुर्घटना घडली. यामध्ये तब्बल नऊ सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर घटनास्थळी एकूण 27 सिलेंडर तसेच टँकर मधून गॅस काढून सिलेंडर मध्ये भरण्यासाठी वापरली जाणारी साधने आढळून आली. घटना घडल्यानंतर संबंधितांनी घटनास्थळावरून पोबारा केला.

दरम्यान, या घटनेची राज्यभर चर्चा झाली. खुद्द आरोग्यमंतत्री तानाजी सावंत यांची जेएसपीएम संस्था असल्याने सोमवारी सकाळी त्यांनी तात्काळ घटनास्थळी (Tathawade) भेट दिली. त्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी या घटनेसाठी जबाबदार पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले.
चौघांवर गुन्हा दाखल
गॅस चोरी आणि आगीच्या घटनेला कारणीभूत ठरल्याबाबत महिपाल चौधरी (रा. पुनावळे), राहुलकुमार राजदेवराम (रा. थेरगाव), मोहम्मद रशीद मोहम्मद नसीम (रा. उत्तर प्रदेश), चंद्रकांत महादेव सपकाळ (रा. ताथवडे) या चौघांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तिघांना पोलिसांनी सोमवारी सकाळी ताब्यात घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.