Pimpri : स्मार्ट सिटीच्या निविदेत ‘रिंग’ झाल्याचा भाजप नगरसेवकालाच दाट संशय

फेरनिविदा काढण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणार्‍या नेटवर्किंगच्या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदेत ‘रिंग’ करुन एल अ‍ॅन्ड टी कंपनीला काम देण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यात रिंग झाली असल्याचा दाट संशय भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केला. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात नगरसेवक काटे यांनी म्हटले आहे की, स्मार्ट सिटी योजनेत पहिल्या टप्यात पिंपळेसौदागर आणि पिंपळेगुरव या परिसराची निवड झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि आम्ही लोकप्रतिनिधी आनंदी आहोत. तथापि, या चांगल्या कामाच्या नियोजनात काही न पटणा-या गोष्टी होत असून विरोधक त्याचे भांडवल करण्याची शक्यता आहे.

स्मार्ट सिटीच्या पहिल्याच 250 कोटी रुपयांच्या निविदेत रिंग करुन एल अॅन्ड टी कंपनीला काम देण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे. निविदेच्या प्री-बीडला अनेक कंपन्या येऊनही त्या सहभागी का झाल्या नाहीत. त्यांच्या लेखी योग्य मागण्यांचा विचार का झाला नाही? निविदेला चारवेळा मुदवाढ का देण्यात आली असे अनेक मुद्दे संशयास्पद आहेत.

एल अॅन्ड टी कंपनीला वाढीव दराने मंजूर झालेली निविदा संशयास्पद वाटत आहे. या कामासाठी केवळ तीनच ठेकेदारांनी सहभाग घेऊनही 21 कोटी रुपये ज्यादा दराने निविदा प्राप्त झाली. त्यामुळे या प्रक्रियेत ‘रिंग’ झाल्याचा दाट संशय आहे. विरोधक यावरुन आरोप करत आहे. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांची बदनामी होत आहे. त्यासाठी या कामाची फेरनिविदा काढण्यात यावी. त्यामुळे जास्त ठेकेदारांना यामध्ये सहभाग घेता येईल. सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांची बचत होईल, असे नगरसेवक काटे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.