Pimpri Corona Update : रुग्णसंख्या वाढतेय! सक्रिय रुग्णांची संख्या गेली 105 वर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या (Pimpri Corona) रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन अलर्ट झाले असून चाचण्या वाढविल्या आहेत. चाचण्या वाढल्याने  एप्रिल व मे महिन्यातील आठ आठवड्यांच्या तुलनेत जूनच्या पहिल्या आठवड्यात शहरात रुग्णांची संख्या वाढली आहे. शहरातील सक्रीय रुग्णसंख्या 105 वर पोहोचली आहे. यापूर्वी 13 मार्च रोजी 113 रुग्ण होते. 14 मार्चपासून रुग्णसंख्या कमी-कमी होत गेली. मात्र, तीन जूनपासून ती पुन्हा वाढू लागली आहे.

मुंबई व लगतच्या महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्या (Pimpri Corona) कासवगतीने वाढत आहे. राज्य शासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन सावध झाले असून, तपासणीचे प्रमाण वाढवले आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत जूनमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत आहे, त्यामुळे नागरिकांनी स्वतःच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणेही आवश्यक आहे. महापालिकेने तपासणी व लसीकरणावर भर दिला आहे. 1 जून रोजी 9 रुग्ण, 2 जून 3, 3 जून 9, 4 जून 27, 5 जून 18 आणि 6 जून रोजी 19 रुग्ण आढळले. तर, सक्रिय रुग्णांची संख्या 105 वर पोहोचली आहे.

Maharashtra Monsoon : ये रे ये रे पावसा…. राज्याला मान्सूनचे वेध; मान्सूनची पुन्हा हुलकावणी

आकुर्डीतील कुटे हॉस्पिटल, चिंचवडचे तालेरा रुग्णालय, नवीन थेरगाव रुग्णालय, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह, यमुनानगर रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, जुनी सांगवीतील अहिल्यादेवी होळकर शाळा, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) कुटुंब कल्याण विभाग खोली क्रमांक 62 या आठ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. प्रत्येक केंद्रावर 12 वर्षांवरील मुलांपासून सर्वांना सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेचार या वेळेत लस दिली जात आहे. मात्र, साप्ताहिक सुटीसाठी प्रत्येक रविवारी लसीकरण केंद्र बंद राहतील. सर्व केंद्रांवर गर्भवती, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी यांच्यासह महापालिका वॉर्डनिहाय केंद्रीय किऑस्क टोकन प्रणालीनुसार नोंदणी केलेल्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, सरकारच्या सूचनेनुसार तपासणीचे प्रमाण वाढविले आहे. राहिलेले लसीकरण पूर्ण करण्यावर भर दिला आहे. रुग्णसंख्येवर यंत्रणा लक्ष ठेवून आहे. रुग्णसंख्या अधिक वाढल्यास रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्याची तयारी ठेवली आहे. त्यासाठी पिंपरीतील नवीन जिजामाता, नवीन थेरगाव, नवीन भोसरी व आकुर्डी येथील रुग्णालयात उपचाराची व्यवस्था करण्याचे विचाराधीन आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.