Pimpri News : महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विषेश मोहिम राबवावी, उपाययोजनांवर भर देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – राज्यभरात महिलांवर वाढत्या अत्याचारांच्या घटना पाहता महिलांच्या सुरक्षेसाठी  पिंपरी- चिंचवड पोलिसांनी विशेष मोहिम राबवावी व उपाययोजना यांच्यावर भर द्यावा अशी मागणी डॉ, बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रयत विद्यार्थी विचार मंचाचे अध्यक्ष धम्मराज साळवे, महासचिव संतोष शिंदे उपस्थित होते. कदम यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचारांच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी कडक पावलं उचलण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष उपक्रम राबवावा.  प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये वुमन सेफ्टी सेलची स्थापना करावी. तसेच निर्भया पथक उपक्रम सुरू करावेत. शहरातील प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीतील अंधाराची ठिकाणे, निर्जन ठिकाणांचा आढावा घेवुन त्या ठिकाणी बीट मार्शल, पेट्रोलिंग मोबाईल वाहनं यांची जास्तीत जास्त गस्त ठेवावी.

अंधाराच्या आणि निर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्याकरीता महापालिकेशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करावा. निर्जन स्थळी, अंधाराच्या ठिकाणी क्यूआर कोड लावावेत, जेणेकरुन अनुचित प्रकार टाळता येईल आणि त्यास प्रतिबंध करता येईल.  पोलीस ठाणे हददीत ज्या ठिकाणी सार्वजनिक महिला प्रसाधनगृहे आहेत. त्या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत पुरेशी लाईट व्यवस्था करून घ्यावी. गस्ती दरम्यान पोलिसांना संशयीत व्यक्ती आढलळी तर त्याची चौकशी करावी तसंच गरज भासल्यास कारवाई करावी. रात्री गस्ती दरम्यान एखादी महिला एकटी आढळून आल्यास महिला पोलीस अधिकारी/ अंमलदारांमार्फत विचारपूस करून त्यांना तात्काळ योग्य ती मदत देण्यात यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.