Akurdi News : समाजाच्या समस्या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सुटतील ! – सुरेश कंक

एमपीसी न्यूज – ‘असंख्य वीरांच्या हौतात्म्यातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे माहिती अधिकार कायद्याचे वरदान लाभले असले तरी समाजाच्या समस्या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सुटतील !’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश कंक यांनी व्यक्त केले.  

जागृत नागरिक महासंघ (महाराष्ट्र राज्य) या संस्थेच्या तृतीय आणि चतुर्थ (एकत्रित) वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश कंक बोलत होते. शुक्रवारी (दि.09) विजय कॉलनी, आकुर्डी येथे हा कार्यक्रम पार पडला.

सोलापूर येथील माहिती अधिकारतज्ज्ञ उदयराज आळंदकर, कोल्हापूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अमरनाथ शेणेकर, जागृत नागरिक महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष नितीन यादव, खजिनदार रोहिणी यादव, मावळ विभागप्रमुख दत्तात्रय काजळे यांची उपस्थिती होती.

यावेळी उदयराज आळंदकर यांनी माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी प्रक्रिया आणि त्यासंबंधीच्या अनुभवांचे कथन केले. कोरोनामुळे नुकत्याच दिवंगत झालेल्या महासंघाच्या जेजुरी शाखेचे सचिव सुरेश घोणे आणि दुर्गा घोणे या युवा दांपत्याला श्रद्धांजली अर्पण करून आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

याप्रसंगी कोरोनायोद्ध्यांना शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील भारती कांबळे, हनुमंता मल्लेफुल, अस्मिता तकटे; पिंपरी-चिंचवड यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी दिलीप करंजखेले, अपर तहसील कार्यालय पिंपरी-चिंचवडचे भीमाशंकर बनसोडे, मावळ धामणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका कल्याणी लोखंडे, परिमंडल ‘अ’ आणि ‘ज’चे परिमंडल अधिकारी दिनेश तावरे, सातारा जिल्ह्यातील एक हजार विवाह जुळविणारे प्रकाश पाटील, माहिती अधिकार क्षेत्रातील मावळचे सुनील गुजर, जेजुरीचे किशोर खोमणे, पिंपरी-चिंचवड विभागाचे अशोक कोकणे पिंपरी-चिंचवड मनपाचे कार्यकारी अभियंता विलास देसले या व्यक्तींचा समावेश होता.

 

 

पुरस्कारार्थींच्या वतीने सुनील गुजर यांनी मनोगत व्यक्त केले. कोविड-19 प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करून मर्यादित उपस्थितांमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. राजेश्वर विश्वकर्मा, राजू डोगीवाल, डॉ. वसंत भांदुर्गे, सतीश घावटेमर्दान, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात परिश्रम घेतले. राजाराम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे सचिव उमेश सणस यांनी आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.