Vadgoan Maval : भाजप कार्यकर्त्याला हात लावाल तर तसेच चोख उत्तर मिळेल – माजी राज्यमंत्री बाळा भेग़डे

संबंधितांवर पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – येथून पुढील कुठल्याही निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला हात लावला तर त्याच पद्धतीने चोख उत्तर दिले जाईल. मारहाण करणाऱ्या सबंधितावर त्वरित पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, नाहीतर तालुक्यात मोर्चे काढून उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिला.

दोन दिवसांपूर्वीपासून जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. मावळ तालुक्यातील ५५ सोसायटीचे प्रतिनिधी पाठविण्यासाठी वडेश्वर सोसायटीत ठराव करणाऱ्या भाजपाच्या काही संचालकांना वडगाव येथील एका हाॅटेलमध्ये विरोधी गटाच्या लोकांनी मारहाण केली. त्याचा निषेध करण्यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली वडगाव येथे तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी भेगडे बोलत होते.

भेगडे पुढे म्हणाले की गेल्या पंचवीस वर्षांच्या भाजपाच्या काळात कधीही बँकेच्या निवडणुकीत असे प्रकार घडले नव्हते. सध्या मावळमध्ये गुंडगिरी व दडपशाही सुरू असून पोलिस खाते संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. तक्रार दाखल करून घेत नसून दबाव आणत आहेत. जर संबंधितावर कारवाई केली नाही तर उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा भेगडे यांनी दिला.

या वेळी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, जिल्हा बँक संचालक बाळासाहेब नेवाळे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांची भाषणे झाली. या मोर्चात अविनाश बवरे, प्रशांत ढोरे, सुमित्रा जाधव, अर्चना म्हाळसकर, सभापती सुवर्णा कुंभार, निकीता घोटकुले, ज्योती शिंदे, बाळासाहेब घोटकुले, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, संतोष कुंभार, एकनाथ टिळे, संदीप काकडे, आदी मान्यवर उपस्थित होते सभेनंतर तहसीलदार मधुसूदन बर्गे  यांना निवेदन देण्यात आले.

पोलिसांवर दबाव नाही- पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर

वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप देसाई व तीन पोलिस कर्मचारी हे मारहाण झालेल्या मारुती खाडभोर यांच्या घरी चार दिवस जात असून त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला आहे. हा सर्व राजकीय स्टंट असून आम्हाला तक्रार द्यायची नसल्याचे सांगितले. तसेच धोका असलेल्या सहा संचालकांनी आम्हाला धोका नसून आमची काहीएक तक्रार नाही असे लिहून दिले असून यासंदर्भात कोणीही तक्रार द्यावी, आम्ही ती घेऊन कारवाई करू असे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.