Third Wave : संभाव्य कोरोना लाटा मुलांसाठी अधिक धोकादायक ठरतील हा केवळ अंदाज – डॉ. प्रवीण कुमार

एमपीसी न्यूज – ‘कोविड-19 हा एक नवा विषाणू आहे, जो आपले स्वरुप बदलू शकतो. आता भविष्यात येणाऱ्या संभाव्य लाटा मुलांवर अधिक प्रभावी ठरतील का, किंवा त्यांच्यासाठी धोकादायक असतील हे सगळे केवळ अंदाज आहेत. असे मत नवी दिल्ली येथील एलएचएम कॉलेजच्या बालरोगचिकित्सा विभागाचे संचालक डॉ. प्रवीण कुमार यांनी व्यक्त केले आहे.

लोकांच्या मनात कोविडविषयी असलेल्या विविध शंकाकुशंका आणि प्रश्नांना, दिल्लीच्या लेडी हार्डिंग्ज वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालचिकित्सा विभागाचे संचालक डॉ. प्रवीण कुमार यांनी उत्तरे दिली आहेत.

डॉ. प्रवीण कुमार म्हणाले, ‘लोकांचा असा अंदाज आहे की पुढची लाट आली तर तोपर्यंत, म्हणजेच पुढच्या काही महिन्यांत बहुतांश प्रौढ व्यक्तींचे लसीकरण झालेले असेल, मात्र मुलांसाठी अद्याप आपल्याकडे सध्यातरी लस उपलब्ध नाही, त्यामुळे त्यांना या लाटेचा फटका बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

मात्र, आपल्याला या विषाणूचे भविष्यात कसे वर्तन राहील, त्याचा मुलांवर परिणाम होईल का, हे आतातरी सांगता येणार नाही. आपल्याला या संसर्गापासून मुलांचे संरक्षण करायचे आहे, एवढेच आता लक्षात घेतले पाहीजे. त्यासाठी, घरातील मोठ्या माणसांनी कोविड विषयक नियमांचे पालन करायला हवे. सामाजिक कार्यक्रम टाळायला हवेत. जेणेकरुन त्यांना संसर्ग होणार नाही आणि घरातील मुलांचेही संरक्षण होईल. तसेच घरातील सर्व प्रौढ व्यक्तींनी लस घ्यायला हवी, त्यामुळेही आपण आपल्या मुलांचे संरक्षण करु शकतो.

आणि आता तर, गरोदर महिला तसेच स्तनदा मातांसाठीही लस उपलब्ध झाली आहे. यामुळे त्यांच्यासोबतच त्यांच्या गर्भातील अर्भकांचे आणि शिशूंचेही संरक्षण होऊ शकेल असे ते म्हणाले.

कोविडच्यां दुसऱ्या लाटेचा मुलांवर कसा आणि किती परिणाम झाला या प्रश्नाला उत्तर देताना कुमार म्हणाले, ‘दुसऱ्या लाटेचा मुलांवर समान परिणाम झाला आहे. कोविड-19 हा एक नवा विषाणू असून, त्याचे परिणाम सर्व वयोगटांवर जाणवत आहेत. कारण आज आपल्याकडे या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती नाही. एनसीडीसी/आयडीएसपी च्या डॅशबोर्ड नुसार, कोविड संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांपैकी 12 टक्के रुग्ण 20 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहेत.

अलीकडेच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, मुलांमध्ये देखील प्रौढ व्यक्तींइतकीच सिरो-पॉझिटिव्हीटी म्हणजेच सामूहिक प्रतिकारशक्ती आहे. मात्र, दुसऱ्या लाटेत संसर्ग झालेल्यांची संख्या पहील्या लाटेपेक्षा अधिक असल्याने, साहजिकच तुलनेने मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाणही अधिक आहे. आतापर्यंत मुलांमधील मूत्यूचे प्रमाण प्रौढांच्या तुलनेत कमी आहे. तसेच, सहव्याधी असलेल्या मुलांमध्ये ते सर्वसाधारणपणे अधिक असल्याचे आढळले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.