Hinjawadi News : पार्थ पवार यांच नाव घेऊन पोलीस अधिकाऱ्याला धमकी

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांच नाव घेऊन पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुन्ह्यात खोटी साक्ष नोंदवणे आणि चुकीच्या पद्धतीने तपास करण्याबाबत आरोपीने दबाव टाकला. पोलीस अधिकारी रजेवर असताना 22 मार्च रोजी हा प्रकार घडला.

पोलीस उपनिरीक्षक नकुल न्यामणे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अश्रफ मर्चंट नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्यात अमित देवराम कलाटे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नकुल न्यामने करत आहेत. न्यामणे रजेवर असताना अश्रफ मर्चंट नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन केला.

‘मी पार्थ पवार यांचा मित्र आहे. तुमच्याकडे अमित कलाटे चा विषय आहे ? तुमच त्या विषयात काय स्टँड आहे ? मी आणि पार्थ पवार यांचे पीए सागर जगचाप अमित कलाटे याचे खास मित्र आहोत. मी सांगतोय ते ऐका वाटल्यास तुम्हाला, जिजाई बंगला येथे डायरेक्ट समोर घेऊन जाईन, अमितचा काय विषय असेल तो मिटवून घ्या नाहीतर विषय वरपर्यंत घेऊन जावं लागेल. राष्ट्रवादी प्रवक्ता उमेश पाटील यांनी पण मला तुम्हाला विचारून घ्यायला सांगितले आहे.’ असे बोलून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. असे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.