Chinchwad News : अवैध दारूविक्री प्रकरणी चाकणमध्ये तीन तर वाकडमध्ये एका ठिकाणी कारवाई

6 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी तर वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या चार कारवायांमध्ये पोलिसांनी 6 लाख 66 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चाकण पोलिसांनी तीन ठिकाणी कारवाई केली. त्यात पहिली कारवाई शुक्रवारी (दि. 30) दुपारी एच पी चौक महाळुंगे येथील हॉटेल तुळजा भवानी येथे करण्यात आली. सत्यपाल किशोर बोरकर (वय 38, रा. खालुम्ब्रे, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी हॉटेलमधून 6 हजार 980 रुपयांची विदेशी दारू जप्त केली.

चाकण पोलिसांनी दुसरी कारवाई शनिवारी (दि. 31) दुपारी खेड तालुक्यातील गडद गावच्या हद्दीत केली. यात 7 हजार 135 रुपयांच्या देशी, विदेशी दारूच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी अक्षय ज्ञानेश्वर साबळे (रा. गडद, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलिसांनी तिसरी कारवाई शनिवारी (दि. 31) सायंकाळी खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव मधील चाकण-शिक्रापूर रोडवर असलेल्या हॉटेल शिवराज चायनीज येथे केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी 4 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी विशाल रामदास येनभर (वय 23, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील तिन्ही प्रकरणांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

चौथी कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाने निंबाळकर नगर, ताथवडे येथील हॉटेल कोल्हापुरी व्हेज नॉनव्हेज येथे शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी केली. याप्रकरणी अशोक मोहनलाल चौधरी (वय 33, रा. पवनानगर, चिंचवडगाव), प्रकाश विलास गायकवाड (वय 24, रा. ताथवडे) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाई मध्ये 6 लाख 46 हजार 955 रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या आणि रोख रक्कम जप्त केली. याबाबत वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.