Wakad Chowk : खड्डे चुकवताना ट्रक पलटी झाल्याने वाकड चौकात वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज : खड्डे चुकवताना ट्रक पलटी झाल्याने पुणे-बंगलुरु हायवेवरील वाकड चौक (Wakad Chowk) येथे आज दुपारी वाहतूक कोंडी झाली. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला.

याबाबत माहिती देताना, वाकडमधील रहिवाशी व्यंकटेश बजाज म्हणाले की, “आज दुपारी 1 ते 1.30 च्या दरम्यान मी वाकडहून बाणेरला जात असताना भूमकर चौक ते वाकड चौक दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांची लांब रांग लागली होती. तसेच, वाहने धीम्या गतीने जात होती. मी जेव्हा वाकड चौकात पोहोचलो, तेव्हा वाकड पोलीस चौकी जवळ पाहिले, की पुलाच्या खाली एक ट्रक पलटी होऊन पडला आहे. तेथे दोन क्रेन होते, जे ट्रकला सरळ करण्यासाठी आणले गेले होते. वाहतूक पोलीस वाहतूक नियमन करत होते व वाहनांना थांबू देत नव्हते.”

अपघाताचे संभाव्य कारण विचारले असता, ते म्हणाले की वाकड चौकात मेन हायवेवर मोठे 2 ते 3 खड्डे आहेत. जर मोठे वाहन जसे कार, ट्रक 40 किलोमीटर प्रति तास वेगाने येत असेल, तर एक तर मोठा खड्डा पाहून लेन बदलण्याचा प्रयत्न करते. पण त्यावेळेस मागून दुसरे वाहन येत असेल तर लेन बदलता येत नाही. अशा वेळेस खड्ड्यातून जावे लागते व ब्रेक दाबून स्पीड कमी केल्यास वाहन स्लिप होण्याची शक्यता असते. ट्रकनेसुद्धा ब्रेक दाबला असावा व खड्ड्यामुळे तोल जाऊन तो पलटी झाला असावा.”

Talegaon Crime : महिलेच्या घरात घुसून तोडफोड करत तिच्या मुलाला दिली जीवे मारण्याची धमकी

वाकडमधील रहिवाशी तसेच पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशनच्या व्हाईस चेअरमन तेजस्विनी सवाई ढोमसे म्हणाल्या, की भूमकर चौक ते वाकड चौक या भागात पुणे – बंगळुरू हायवेवर खूप खड्डे झालेले आहेत. दोन ते तीन खूप मोठे खड्डे आहेत. त्यामुळे वाहन चालकांना ते चुकवत (Wakad Chowk) जाताना खूप त्रास होतो.

हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी माहिती दिली, की एक डम्पर ट्रक आज 12.45 वाजेच्या सुमारास वाकडहून साताऱ्याच्या दिशेने पुणे- बंगळूरु हायवेवरून जात असताना एक मोठा खड्डा चुकवताना त्याचा तोल गेला व तो डिव्हायडरला धडकून पलटी झाला. ड्राइव्हर मधुकर कांबळे (वय अंदाजे 30 ते 32 वर्षे) हा किरकोळ जखमी झाला होता व तो ट्रक सोडून पळूण गेला होता. अपघाताची माहिती मिळताच लगेच हिंजवडी वाहतूक विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली. ट्रकला सरळ करण्यासाठी दोन क्रेन बोलवण्यात आल्या. ट्रक पलटी झाल्याने टाकीतून डिझेल लीक होऊन रस्त्यावर सांडले होते. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचा एक बंब बोलवण्यात आला होता.

 अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रोडवरील सांडलेले डिझेल साफ केले. वाहतूक विभागाचे कर्मचारी यांनी वाकड पोलीस चौकीजवळ मेन हायवेवरून बाणेरकडे जाणारी वाहने सर्व्हिस रोड वरून वळवली . तसेच क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला डंपर ट्रक सरळ करत असताना तो पलीकडे पडण्याची शक्यता असल्याने पलीकडे देखील वाहतूक विभागाचे कर्मचारी तैनात होते. 10 ते 12 वाहतूक विभागाचे कर्मचारी वाकड चौकामध्ये दोन्ही बाजूला वाहतूक नियमन करत होते. अंदाजे दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास ट्रक सरळ करून हिंजवडी वाहतूक विभागाच्या कार्यालयाजवळ नेण्यात आला. त्यानंतर ट्रक डंपर ड्रायव्हर मधुकर कांबळे व त्याचा मालक हा वाहतूक पोलिसांच्या पोलीस चौकीत आला.

तसेच वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हायवेवर आणखी नवीन अपघात होऊ नये यासाठी तेथील खड्डे बुजवले. आज दिलीप लोखंडे, स्वामी होनकळस, तुकाराम ढाकणे, सखाराम पोले, अनिल सांगळे, रंजुसिंग गुमलाडु, राजेंद्र चव्हाण, निलेश काळे, बाळासाहेब खेडकर व अमोल पवार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या नेतृत्वाखाली हे काम केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.