Traffic News : वाहन चालकांनो सावधान ! अन्यथा तुमच्यावरही होईल गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी कंबर कसली (Traffic News) आहे. वाहतुकीचे नियम मोडून धोकादायक पद्धतीने विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे वाहन चालकांना चांगलेच महागात पडणार आहे. अशा वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळूनच वाहन चालवणे चालकांसाठी फायद्याचे ठरणार आहे.

मागील एक आठवड्यापासून पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी ट्रिपल सीट आणि विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात कारवाईची मोहीम उघडली आहे. मागील एक आठवड्यामध्ये ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या 171 वाहन चालकांवर वाहतूक विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भारतीय दंड संहिता कलम 279 प्रमाणे हे गुन्हे दाखल केले जात आहेत.

 

Sangvi : बांधकाम साइटवरून लॅपटॉप व मोबाईल चोरीला

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तसेच अपघातांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने ही मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. वाहतूक विभागाकडून वेळोवेळी विविध मोहिमा राबवल्या जातात. जानेवारी महिन्यात अशाच प्रकारची एक मोहीम पोलिसांनी राबवली. शहरातील 14 वाहतूक विभागांमध्ये राबविलेल्या या मोहिमेत अवघ्या दोन दिवसात नऊ लाख एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याप्रकरणी थेट खटले दाखल करून प्रकरणे न्यायालयात सादर करण्यात आली. तर विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.

अशी केली जाते कारवाई

ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यास संबंधित वाहनचालकावर एक हजार रुपये दंड आकारला जातो. तसेच वाहन चालकाचा वाहन चालविण्याचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द केला जातो. वाहन चालविण्याचा परवाना नसेल तर विनापरवाना वाहन चालविल्याची देखील कारवाई केली जाते. धोकादायकरित्या वाहन चालविल्यास भारतीय दंड संहिता 279 प्रमाणे गुन्हे दाखल केले जात आहेत.

काय आहे कलम 279

भारतीय दंड संहिता कलम 279 हे सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन हाकणे किंवा सवारी करणे, याबाबत आहे. मानवी जीवितास धोका होईल, दुखापत, नुकसान पोहोचविण्याचा धोका निर्माण होईल अशा प्रकारे हयगयीने, बेदरकरपणे वाहन चालविल्यास या कलमान्वये गुन्हा दाखल केला जातो. यामध्ये सहा महिन्यांपर्यंत कारावास अथवा एक हजार रुपये आर्थिक दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

आता तरी सुधरा

वाहतूक विभागाकडून सुरु असलेली कारवाई यापुढे देखील अशीच सुरु राहणार आहे. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळून वाहने चालवावीत अन्यथा कारवाई केली जाईल, असे पिंपरी वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले. वारंवार मोहिमा राबवून देखील वाहन चालक काही सुधारण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे वाहन चालाकांनो! आता तरी सुधरा रे, अशी म्हणण्याची वेळ(Traffic News) पोलिसांवर आली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.