Baner News : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने वृक्षारोपण अभियान

एमपीसी न्यूज -“एक-एक  झाड लावुया, वसुंधरेला सजवुया”  हा संदेश देत, रविवार (दिं.२१) पुणे – बेंगलोर बायपास हायवेच्या शेजारील बाणेरच्या टेकडीवर चिंचवड येथील “शिखर फांऊडेशन” अडव्हेंचर क्लब आणि वसुंधरा स्वच्छता अभियान पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने अतिशय उत्साही वातावरणात वृक्षारोपण करण्यात आले.

देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत असताना, गेल्या पंचाहत्तर वर्षाच्या कालखंडात देशाने प्रगतीचे अनेक नवनवीन विक्रम प्रस्थापीत केले आहेत.विज्ञानाने तर केंव्हाच गगनभरारी घेतली आहे.औद्योगिक प्रगतीचे आणि माहिती तंत्रज्ञानाचे जाळे प्रचंड प्रमाणात विस्तारत आहे आणि  मग या मधूनच शहरीकरण प्रचंड प्रमाणात विस्तारले आहे.खेडी ओस पडून, शहरे ओसंडून वाहत आहेत.शहरांचा श्वास गुदमरतोय.ऑक्सिजनविकत घ्यावा लागेल याची कल्पनासुद्धा कोणी केली नसेल,पण ते सुद्धा दिवस आपण पाहिले. त्यानंतरच्या काळात “झाडे लावा – झाडे जगवा” मोहीम धूमधडाक्यात वाजत राहिली आणि शेवटी पुन्हा एकदा लोकांनी ‘विसरणे’ या  जन्मजात स्वभावाला कुरवाळत ही मोहीम झुगारून दिली. झाडे तोडली जात आहेत. शहरे आमिबासारखी वाढत आहेत.

शहराचा श्वास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेकड्या त्यावरील वनराई भुईसपाट करून गिळंकृत केल्या जात आहेत.  त्यातून काही मोजक्या टेकड्या शिल्लक राहिल्या आहेत त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून वनराई फुलवण्याचे काम करणाऱ्या “वसुंधरा स्वच्छता अभियान” या संस्थेच्या मदतीने अडव्हेंचर  क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या “शिखर फाऊंडेशन” या संस्थेच्या सदस्यांनी ही सर्व परिस्थिती भावी पिढीला समजावी व संस्थेच्या हातून वसुंधरेची सेवा घडावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन काल अनेक तरुण – तरूणींच्या तसेच वरिष्ठ सदस्यांच्या हस्ते अनेक औषधी तसेच देशी व आधुनिक झाडांचे रोपण करण्यात आले. या मध्ये प्रामुख्याने कडू लिंब, वड, पिंपळ, उबंर, बेल, पारिजात, कदंब आणि चेअरी अशी झाडे लावण्यात आली.

वृक्षारोपणासाठी शिखर चे अध्यक्ष विवेकानंद तापकीर, उपाध्यक्ष जालिंदर वघोले खजिनदार प्रविण पवार, विक्रांत शिंदे, संजय भाटे, शिवाजी आंधळे, सुधीर गायकवाड, गुलाब जरांडे, नंदू लिंभोरे तसेच “वसुंधरा स्वच्छता अभियान” चे पुष्कर कुलकर्णी, दीपक श्रोते, आनंद उपाध्ये, शैलेंद्र पटेल, निधी कुलकर्णी, शैलेश वालवैकर, महेश मोरे, दुर्गेश त्रिवेदी, वैभव पंडीत, सूरज मुंदडा हे उपस्थित होते. प्रारंभी पुष्कर कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत करून वनराई चे महत्व विषद करून झाडे लावण्याची पद्धती समजावून सांगितली. तर श्री विवेकानंद तापकीर यांनी तरुण पिढीने या कामात झोकून दिले पाहिजे असे सांगत “शिखरच्या” नव तरुणांना या कामी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी “वसुंधरा स्वच्छता अभियान ” परिवारातील सदस्यांसह शिखर परिवारातील महिला सदस्यांसह अनेक तरुण-तरुणी सह बच्चे कंपनी सुद्धा उपस्थित होती. तरुणांमध्ये प्रामुख्याने सुशांत काटे, स्वप्नील आंधळे, वैभव देवकर, प्रथमेश शिंदे, रवी दराडे, श्रेया लोहकरे, श्रुष्टी लोहकरे, तनुष्का गायकवाड, सुरभी पवार आणि विशेष म्हणजे “सोशियल आवुट्रिज” या कॉलेजियन युवक युवतींचां एक संघ सुद्धा या वेळी उपस्थित होता. या सर्व युवकांनी खड्डे घेण्यापासून ते झाडे लावणे व परिसरातील कचरा गोळा करणे इत्यादी कामे स्वयंप्रेरीत होऊन केली.

विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रम प्रसंगी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “वसुंधरा” परिवारातील पंचाहत्तर मित्रांनी एकत्र येऊन, रोपण केलेल्या झाडांच्या देखभाल खर्चा पोटी प्रत्येकी सातशे पन्नास रुपये वर्गणी जमा करून पंचाहत्तर झाडे दत्तक घेऊन समाजात एक वेगळा संदेश दिला.

विशेष म्हणजे हा कार्यक्रम जुळवून आणण्यासाठी तसेच संपन्न करण्यासाठी समन्वयक म्हणून पुणे जिल्हा वन्यजीव असोशियन चे अध्यक्ष तथा शिखर आणि वसुंधरा चे सदस्य, सर्पमित्र आणि वनमित्र श्री. सुरेश ससार यांनी कष्ट घेतले. तसेच कार्यक्रमानंतर वनभोजनाची व्यवस्था संतोष चांदेरे यांनी केली.शेवटी शिवाजी आंधळे यांनी आभार व्यक्त करून पुन्हा-पुन्हा वसुंधरेची सेवा करण्याची संधी मिळो !  अशी इच्छा व्यक्त करत वृक्षारोपण अभियानाचा एक भाग संपन्न झाल्याचे जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.