Viral Diseases Pimpri : व्हायरल आजारांचे प्रमाण वाढल्याने बाल रुग्णालयात 50 ते 100 टक्के रुग्णांची वाढ

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड (Viral Diseases Pimpri) शहरात सध्याच्या ऊन – पावसाच्या खेळामुळे लहान मुलांमध्ये व्हायरल ताप व सर्दी, हॅन्ड टू माऊथ, डेंग्यू, कावीळ आजारांचे प्रमाण वाढल्याने बालरोग तज्ज्ञ व रुग्णालयात 50 ते 100 टक्के रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

सध्या श्रावण महिन्यात आकाशात ऊन-पावसाचा खेळ चालू असल्याने वातावरण दिवसातून अनेक वेळेला बदलत आहे. त्याचा फटका लहान मुलांना सर्वाधिक बसत आहे. यामुळे लहान मुलांमध्ये विविध आजार होत आहेत. त्यामुळे शहरातील विविध भागातील बालरोग तज्ञांचे क्लिनिक व रुग्णालयात बाल रुग्णांची संख्येमध्ये 50 ते 100 टक्के वाढ दिसत आहे. तसेच, बालरोग तज्ञांचे क्लिनिक व रुग्णालयात बाल रुग्णांना घेऊन थांबलेल्या पालकांची मोठी गर्दी दिसत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण रुग्णालय आहे. ज्याला वायसीएम हॉस्पिटल असेही म्हणतात.

डॉ. दिपाली अंबिके (बालरोग विभाग प्रमुख, यशवंतराव चव्हाण रुग्णालय) म्हणाल्या की, “पूर्वी 50 ते 60 बालरुग्ण ओपीडीमध्ये येत असतात. आता ती संख्या जवळ जवळ दुप्पट होऊन 100 झाली आहे. यामध्ये डेंग्यू, कावीळ, व्हायरल फीवर यांचे प्रमाण वाढले आहे. त्यापैकी दहा ते पंधरा बालरुग्णांना ऍडमिट करावे लागते.”

पालकांना व मुलांना या आजारापासून वाचवण्यासाठी उपाय योजनेबद्दल अंबिके म्हणाल्या की, “काविळ होऊ नये, यासाठी पाणी उकळून किंवा फिल्टर करून प्यावे. तसेच, उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये. डेंग्यू हा रोग मच्छर चावल्याने होतो. मच्छर चावू नयेत, यासाठी मुलांनी फुल लेंग्थ कपडे घालावेत. तसेच, मच्छर दानी व मच्छर विरोधी उपाय जसे क्रीम, अगरबत्ती व इतर साधनांचा वापर करावा. मच्छरांची पैदास आजूबाजूच्या परिसरात होऊ नये यासाठी घराच्या जवळ पावसाच्या पाण्याची डबकी होऊ देऊ नये; तसेच कुंड्यांमध्ये पावसाचे पाणी साचू देऊ नये.”

पिंपरीमधील (Viral Diseases Pimpri) बालरोगतज्ञ डॉ. सुयश संघवी म्हणाले की, “व्हायरल फिवर व कफ तसेच ‘हॅन्ड टू माऊथ’ या आजारांचे प्रमाण मुलांमध्ये वाढले असून, त्यामुळे त्या बाल रुग्णांची संख्या 50 ते 60 टक्क्यांनी वाढलेली आहे. आजारी मुलांनी शाळेत जाऊ नये, कारण की त्यांच्यामुळे इतर विद्यार्थ्यांना या रोगांची लागण होऊ शकते.”

चिखली येथील बालरोगतज्ञ डॉ. प्रद्युम्न पद्माकर म्हणाले की, “माझ्याकडे येणाऱ्या 80% बाल रुग्णांना व्हायरल फीवर, डेंग्यू व हॅन्ड टू माऊथ असे आजार झालेल असतात. हे आजार होऊ नयेत, यासाठी मुलांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच, ज्यांना हे आजार झाले आहेत. त्या मुलांनी शाळेत जाऊ नये. जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना या रोगांची लागण होणार नाही. पालकांनी शक्य असल्यास त्यांच्या मुलांना इन्फलूएंजा व फ्लू यांचे लस द्यावेत.”

वाकडमधील बालरोगतज्ञ डॉक्टर कपिल जाधव म्हणाले, की “मुलांमध्ये व्हायरल फिवर व व्हायरल सर्दी परत परत होत आहे. तसेच, व्हायरल खोकल्यामुळे कानाचे इन्फेक्शन होत आहे. माझ्याकडे येणाऱ्या व्हायरल फीवर, सर्दी व हॅन्ड टू माऊथ असे आजार झालेल्या बाल रुग्णांची जवळजवळ दुप्पट झाली आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.