Pune News : स. प. महाविद्यालयाच्या आवारात झाड कोसळून एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील टिळक रस्त्यावरील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या आवारात झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. मालसिंग पवार (वय ५०, रा. जनता वसाहत, पर्वती) असे मृत्युमुखी पडलेल्यांचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मालसिंग पवार महाविद्यालयाच्या आवारातील मुलांच्या वसतीगृहाच्या परिसरात वाढलेले गवत कापण्यासाठी पवार सकाळी साडेअकराच्या सुमारास गेले होते. त्या वेळी अचानक झाड कोसळले. झाडाच्या फांद्या पवार यांच्या अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पवार मूळचे सोलापूरचे आहेत. त्यांना महाविद्यालयाच्या आवारातील मुलांच्या वसतीगृहातील गवत कापण्याचे काम देण्यात आले होते. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.