Crime News : केबल कंपनीत मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कनेरसर या ठिकाणी असलेल्या एका कंपनीत मशीनमध्ये अडकून एका तरुणाचा मृत्यू झाला.एब्रेडर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत हा तरुण केबल गुंडाळण्याचे काम करत होता.स्वस्तिक दयाराम शेलार असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो 25 वर्षांचा होता.कंपनीत काम करत असताना अचानक हात गेल्याने तो ओढला गेला आणि त्याचा मृत्यू झाला असा अंदाज वर्तवला जात आहे. 

दरम्यान मृत तरुणाच्या नातेवाईकांनी मात्र कंपनी प्रशासनाचा निष्काळजीपणामुळेच स्वस्तिकचा मृत्यू झाल्याचा आरोप केलाय.त्यांनी खेड पोलीस ठाण्यात कंपनी प्रशासनाविरोधात तक्रार दिली आहे.पोलिसांनी याप्रकरणी गुन्हाही दाखल केला आहे. मृत तरुणाचा भाऊ प्रतीक दयाराम शेलार यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

मृत स्वस्तिक हा एब्रेडर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सहा महिन्यांपासून नोकरी करत होता.22 ऑगस्टच्या रात्री तो कामावर गेला असताना ही दुर्दैवी घटना घडली.स्वस्तिक हा घरातील एकुलता एक कमावता व्यक्ती होता.त्याच्या घरची परिस्थिती बिकट आहे.त्याचे वडील अंध आहेत तर आई मोलमजुरी करून घराला हातभार लावते.स्वस्तिकच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.