Dighi News : पुन्हा ‘त्याच’ ठिकाणी आढळले 12 गावठी बॉम्ब, दोन महिन्यांपूर्वी येथेच स्फोटात बालिका ठार झाली होती 

एमपीसी न्यूज – भोसरीजवळील वडमुखवाडीत 05 फेब्रुवारी 2022 रोजी एका गावठी बॉम्बचा मोठा स्फोट झाला, त्यात एक पाच वर्षीय बालिका ठार झाली. आता दोन महिन्यानंतर पुन्हा याच ठिकाणी 12 गावठी बॉम्ब आढळून आले आहेत. पोलिसांनी शुक्रवारी (दि.08) हे स्फोटक बॉम्ब जप्त केले आहेत. 

बॉम्ब शोध आणि निर्मूलन पथकाला घटनास्थळी सुपारीच्या आकाराचे 12 बॉम्ब आढळून आले. 05 फेब्रुवारी 2022 रोजी असेच 45 बॉम्ब सापडले होते. खेळण्याच्या वस्तू समजून त्याठिकाणी राहण्यासाठी असलेल्या गवळी समाजातील लहान मुलांनी काही बॉम्ब गोळा केले. त्यापैकी एक बॉम्ब दगडावर आदळल्याने मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात पाच वर्षीय चिमुरडीच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या. हा स्फोट एवढा प्रचंड होता की, स्फोटात तिचे हातपाय तुटून शंभर फूटांवर उडाले.

राधा गोकुळ गवळी (वय 5) या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला होता. तसेच, राधाची बहीण आरती (वय 4) आणि चुलतभाऊ राजेश महेश गवळी (वय 4) ही दोन बालके जखमी झाली होती.

 बॉम्ब येताहेत कुठून हा प्रश्न अनुत्तरितच

डुक्कराची शिकार करण्यासाठी या बॉम्बचा वापर केला जातो असे पोलीस आणि स्थानिक नागरिक सांगतात. तरीही एवढ्या प्रमाणावर बॉम्ब येताहेत कुठून आणि त्याच ठिकाणी उघड्यावर का टाकले जाताहेत हा प्रश्न अनुत्तरितच राहत आहे. दरम्यान, दिघी पोलिसांनी यापूर्वी घडलेल्या घटनेनंतर काही जणांना अटक केली होती. दोन महिन्यांनंतर पुन्हा त्याच ठिकाणी उघड्यावर बॉम्ब सापल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाच्या तळाशी जाऊन प्रकरणाचा छडा लावण्याची गरज असल्याचे त्याठिकाणी पालं ठोकून राहणारे स्थलांतरित नागरिक सांगत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.