Pimpri News: शहरातील 2 लाख 8 हजार 795 नागरिकांनी घेतली लस

कोरोना लसीकरणाचा दोन लाखाचा टप्पा पूर्ण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेच्या 58 आणि 29  खासगी लसीकरण केंद्रांवर 16 जानेवारीपासून आजपर्यंत शहरातील  2 लाख 8 हजार 795 नागरिकांनी कोरोनाची लस टोचवून घेतली आहे. लसीकरणाचा दोन लाखाचा टप्पा पूर्ण झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या आणि दुस-या टप्प्यात वैद्यकिय क्षेत्रातील लोकांना, फ्रंटर वर्कर यांना प्राधान्याने लस दिल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मार्च पासून सुरु झाला. या टप्प्यात 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्ती (को-मॉर्बिड) आणि 60 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस टोचण्यात येत आहे. आता 1 एप्रिलपासून 45 वर्षांपुढील सर्वांना कोरोनाची लस दिली जात आहे.

महापालिकेने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क बंधनकारक, गर्दी टाळणे अशा उपाययोजनांसह लसीकरणावरही भर दिला आहे. महापालिकेची 58 आणि  खासगी 29 अशी 87 लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. 16 जानेवारीपासून आजपर्यंत शहरातील  2 लाख 8 हजार 795 नागरिकांनी कोरोनाची लस टोचवून घेतली आहे.

शहरामधील वय वर्ष 45 वरील नागरिकांनी  महापालिकेच्या नजीकच्या कोविड लसीकरण केंद्रावर लसीकरण करुन घ्यावे. तसेच कोविड-19 प्रसार रोखण्यासाठी लसीकरण केल्यानंतर मास्क, सॅनिटायझरचा वापर व सामाजिक अंतर या गोष्टी पाळणे बंधनकारक असल्याचे महापालिका वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.