Pune News : पुण्यात पूर्व आणि पश्चिम अशा दोन महापालिका स्थापन कराव्यात, रिपाइंची मागणी

एमपीसी न्यूज : समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांचा निर्णयाचा राज्य सरकारने फेरविचार करावा आणि हा निर्णय रद्द करावा, तसेच पूर्व आणि पश्चिम अशा दोन महापालिका स्थापन कराव्यात, अशी मागणी रिपाइंच्या वतीने माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांनी केली. या संदर्भात पक्षाच्या वतीने राज्य सरकारकडे देखील या मागण्यांचे निवदेन देण्यात आले असल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले आहे.

चार वर्षापूर्वी हद्दीत आलेल्या 11 गावांमध्ये अद्याप रस्ते, पाणी, ड्रेनेज या पायाभूत सुविधा दिल्या गेल्या नाहीत. या 11 गावांचा विकास आराखडाही आजमितीला पूर्ण झालेला नाही. तसेच पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिकेला समाविष्ट गावांचा विकास करणे शक्य होणार नाही, म्हणून दोन महापालिका करण्याचे वक्तव्य यापूर्वी केले होते. मात्र आता 23 गावे पालिकेत घेण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाने सामान्य पुणेकरांवर अन्याय होत आहे. क्षेत्रळफ जास्त व उत्पन्न कमी अशा परिस्थितीत नियोजनबध्द विकास करणे अशक्य आहे. पुणे शहराचे अरूंद रस्ते, असमान पाणी पुरवठा, ड्रेनेज समस्या या सर्व समस्यांमध्ये नागरी सुविधा देताना प्रचंड ताण पालिकेवर पडत आहे.

या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली रिपाइंच्या शहर पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत शासनाने 23 गावांचा पालिकेत समावेश करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, तसेच पूर्व व पश्चिम अशा दोन महापालिका कराव्यात असा ठराव राज्य शासनाला देण्यावर एकमत झाल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.